Join us

विराट-अनुष्का देणार खुशखबर; डिव्हिलियर्सनं सांगितलं कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण

IND vs ENG Test Series: भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 18:02 IST

Open in App

virat kohli and anushka sharma pregnancy: सध्या भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. मात्र, अद्याप त्याने यामागील कारण स्पष्ट केले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि विराटचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले आहे. विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या दुसऱ्या पाल्याला जन्म देणार असल्याचे त्याने म्हटले आहे. मिस्टर ३६० त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. 

तसेच विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळे त्याने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली असल्याचे डिव्हिलियर्सने नमूद केले. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला, तेव्हा विराटचे नाव त्यात होते. पण, पहिल्या कसोटीच्या तीन दिवस आधी विराटने माघार घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती आणि त्यानुसार विराटच्या माघारीमागे वेगळेच कारण समोर आले होते. या पोस्टमध्ये आईची प्रकृती खालावल्यामुळे विराटने माघार घेतल्याचा दावा केला गेला. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीआधी संघात दाखल होण्याचीही शक्यता कमीच असल्याचे सांगितले गेले. मात्र यावर विराटच्या भावाने स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 

दरम्यान,  विराटचा भाऊ विकास याने हे वृत्त खोडून काढताना सांगितले होते की, आईच्या प्रकृतीवरून काही चुकीच्या बातम्या पसरत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मला हे स्पष्ट करू द्या की आईची प्रकृती चांगली आहे. माझी लोकांना आणि खासकरून माध्यमांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता अशा बातम्या पसरवू नका.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडएबी डिव्हिलियर्सविराट कोहलीअनुष्का शर्मा