Join us

Ram Mandir: माझे रामलला विराजमान झाले! पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला फोटो, बाबरवर साधला निशाणा

सोमवारी विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी अयोध्येला पोहचतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 14:26 IST

Open in App

Ram Mandir Photo: २२ तारखेला अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आता उलटी गिनती सुरू झाली असून येत्या सोमवारी हा कार्यक्रम पार पडेल. देशासह परदेशात देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटर म्हणून दानिशची ओळख आहे. 

दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझे रामलला विराजमान झाले आहेत", असे त्याने प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो शेअर करत म्हटले.

 

याशिवाय कनेरियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युजरला फटकारले. खरं तर फहीम नावाच्या व्यक्तीने पोस्टमध्ये म्हटले की, चोर कधीच मालक बनू शकत नाही. यासोबत त्याने बाबरी मशीद पाडल्याचा फोटो शेअर केला होता. यावर कनेरियाने प्रत्युत्तर देताना म्हटले, "यामुळेच आता त्याच्या हक्काच्या मालकांनी बाबरकडून त्यांचे मंदिर परत घेतले आहे." कनेरियाने बाबरसाठी 'चोर' शब्दाचाही उल्लेख केला. 

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ११,००० हून अधिक पाहुणे आणि निमंत्रितांना संस्मरणीय भेटवस्तू देण्याची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. राम मंदिरात मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद अशी असेल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त फक्त ८४ सेकंदांचा असणार आहे. 

भव्य कार्यक्रमासाठी उरले काही दिवस सोमवारी विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी अयोध्येला पोहचतील. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना २२ तारखेनंतर दर्शनाला येण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, आपापल्या क्षेत्रातील लोकांना २२ जानेवारीनंतरच रामललाच्या दर्शनाला घेऊन जा. २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामध्ये देशातील निवडक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे आवाहन केले.

टॅग्स :राम मंदिरपाकिस्तानअयोध्याऑफ द फिल्ड