Vinod Kambli Admitted to Hospital Thane | लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी डिसेंबर महिन्यात ठाण्यातील आकृती हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. पण आता नर्सिंग केअरसाठी तो पुन्हा रुग्णालयात दाखल झाला असून त्याच्यावर ज्ञानेश्वर नगर येथील प्रगती हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.
दहा दिवसांपूर्वी तो फॉलोअपसाठी रुग्णालयात आला आहे. येथेच त्याची काळजी घेतली जात आहे. फिजिओथेरपी, फिटनेस ट्रेनिंग आणि त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्याच्या दातांची ट्रीटमेंट देखील करण्यात आली असून दोन नविन दात बसविण्यात आले असल्याचे डॉ. ठाकूर म्हणाले. दोन दिवसांत त्याना घरी सोडले जाणार आहे. त्याला मेंदूचा देखील त्रास आहे, त्याचादेखील फॉलोअप घेतला जात आहे. त्याची विशेष काळजी घेतली जात असून त्याला स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला पुन्हा १५ दिवसांनी फॉलोअपसाठी बोलविले जाणार असल्याचे डॉक्टर म्हणाले. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्टीकरणही ठाकूर यांनी दिले.