Join us  

पुढील १०-१५ वर्षांत भारत अमेरिकेसारखा एक क्रीडा देश म्हणून ओळखला जाईल - सुनील गावस्कर

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 5:04 PM

Open in App

मुंबई : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे या व्यासपीठावर सुवर्ण पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी माजी खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या 'गोल्डन बॉय'चं कौतुक केलं. अशातच दिग्गज सुनील गावस्कर यांनी देखील नीरज चोप्राचे कौतुक केलं असून एक मोठं विधान केलं आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना गावस्कर म्हणाले की, नीरज चोप्राची ही कामगिरी पाहून मला खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं.  कारण इतर खेळांनीही चांगलं प्रदर्शन करणं महत्त्वाचं आहे. नीरजसाठी यावेळी सुवर्ण पदक मिळवणं महत्त्वाचं होतं आणि त्यानं भाला लांब फेकून ते करून दाखवलं. यामुळं इतरांना प्रेरणा मिळते. या चॅम्पियनशिपमध्ये नीरज व्यतिरिक्त इतर तीन भारतीय भालाफेकपटू अंतिम फेरीत होते हे विसरून चालणार नाही. एक खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा त्या खेळाला आणखी प्रतिसाद मिळतो. 

१०-१५ वर्षांत भारत क्रीडा देश असेल - गावस्करतसेच नीरज चोप्राबद्दल ज्या पद्धतीनं लोक विचार करत आहेत. त्यामुळं मला वाटतं की, आपण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाबद्दल बोलतो की, ते क्रीडा देश आहेत. तसंच मला वाटतं की कदाचित पुढील १०-१५ वर्षांत भारताला देखील एक क्रीडा देश म्हणून ओळखलं जाईल, असं गावस्करांनी नमूद केलं. 

दरम्यान, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या भालाफेक स्पर्धेत १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज अव्वल राहिला. त्यानं ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पाकिस्तानचा अर्शद नदीम दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला ८७.८२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकण्यात यश आलं. त्यामुळं पाकिस्तानच्या अर्शदला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 

टॅग्स :नीरज चोप्रासुवर्ण पदकसुनील गावसकरभारत
Open in App