Join us  

भारताच्या माजी क्रिकेटपटूवर नवी दिल्लीमध्ये हल्ला

भंडारीला लोखंडाच्या सळ्या आणि हॉकी स्टीक्सने मारहाण करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 8:10 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या अमित भंडारीवर आज हल्ला करण्यात आला. हा सारा प्रकार दिल्लीतील काश्मिरी गेट येथे दुपारी एक वाजता घडला. हा सारा प्रकार संघनिवडीमुळेच घडला असल्याचे म्हटले जात आहे. भंडारी भारतासाठी दोन एकदिवसीय सामने खेळला असून यामध्ये त्याने पाच बळी मिळवले होते.

भंडारी हा दिल्लीच्या 23-वर्षांखालील निवड समितीचा अध्यक्ष आहे. दिल्लीच्या 23-वर्षांखालील संघाची निवड चाचणी आज काश्मिरी गेट येथे सुरु होती. त्यावेळी भंडारीवर हल्ला करण्यात आला. भंडारीला संत परमानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या हाताला आणि पायाला या हल्ल्यात दुखापत झाली आहे. भंडारीला लोखंडाच्या सळ्या आणि हॉकी स्टीक्सने मारहाण करण्यात आली. यावेळी भंडारीला दुखापत झाली. भंडारी यांच्या डोक्याला आणि हाताला सात टाके पडले आहेत.

दिल्ली क्रिकेट संघटनेतील एका व्यक्तीने सांगितले की, " आज दिल्लीच्या संघाची 23-वर्षांखालील मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड करण्यात येणार होती. यावेळी दिल्लीतील खेळाडूंची निवड चाचणी सुरु होती. त्यावेळी दुपारी एक वाजता भंडारी यांच्यावर हल्ला करण्यात आला. 2-3 मुलांनी एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ला केला. आम्हाला सुरुवातीला नेमके काय घडले ते समजले नाही. पण त्यानंतर आम्ही त्यांना या हल्ल्यातून वाचवले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता त्यांची तब्येत चिंताजनक नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. " 

पोलीस उपायुक्त नुपूर प्रसाद यांनी याबाबत सांगितले की, " दिल्लीच्या संघाची 23-वर्षांखालील मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड करण्यात येत होती. त्यावेळी एका खेळाडूला भंडारी यांनी वगळले. तो खेळाडू भंडारी यांच्याबरोबर आपली निवड का झाली नाही, याबद्दल वाद घालत होता. त्यानंतर तो खेळाडू भंडारी यांना मारायला लागला. पहिल्यांदा त्याने आपल्या हातानेच मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने हॉकी स्टीकने त्यांच्यावर हल्ला केला. डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही. जेव्हा आम्हाला याबाबत अधिक माहिती मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू." 

टॅग्स :दिल्लीभारत