Join us  

T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले

भारतीय खेळाडू आता आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयपीएल २०२४ मधील कर्तव्य पूर्ण करून संघटीत होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 5:14 PM

Open in App

भारतीय खेळाडू आता आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयपीएल २०२४ मधील कर्तव्य पूर्ण करून संघटीत होत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघ दोन बॅचमध्ये न्यूयॉर्कमध्ये दाखल होतील. भारतीय संघाला २००७ नंतर एकदाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, तर २०१३ नंतर त्यांचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ अजूनही कायम आहे. २०२३ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ हा दुष्काळ संपवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांना रोखले. आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्मा त्याच्या नावावर पहिल्या आयसीसी स्पर्धेचे जेतेपद करायला उत्सुक आहे. 

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण, इंग्लंडचा माजी खेळाडू डेव्हिड लॉयड ( David Lloyd ) यांनी टीम इंडियाला घाबरण्याची गरज नाही. त्यांना मागील १० वर्षांत एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, असे विधान करून टीम इंडियाला उगाच डिवचले आहे. लॉयड यांच्यामते मॅन इन ब्लू आगामी स्पर्धेत मोठा इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरतील. 

"भारत हा अंदाज लावता येण्याजोगा संघ आहे. प्रतिस्पर्धी संघ टीम इंडियाचे गुण स्वीकारतात. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत, परंतु ते गोलंदाजी व फलंदाजीत धोका पत्करत नाहीत. ते त्यांच्या क्षणाची वाट पाहतात आणि त्यानेच घात होतोय.. त्यामुळे त्यांना घाबरण्याची खरच गरज नाही," टॉकस्पोर्ट क्रिकेट पॉडकास्टवर लॉयड म्हणाले.

या स्पर्धेसाठी संघ निवडताना वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा झाली, परंतु निवड समितीने पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यावर विश्वास दाखवला. त्याचवेळी स्टार युवा फलंदाज रिंकू सिंग याला राखीव बाकावर बसवले. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला ६ सामन्यांत १९.३३ च्या सरासरीने ११६ धावाच करता आल्या होत्या.  तेच विराटचा ट्वेंटी-२०तील स्ट्राईक रेट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. 

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ