Join us  

विनम्रता, साधेपणा, हार-जीत, हेअरस्टाईल; पंतप्रधान मोदींचं धोनीला खास पत्र

महेंद्रसिंह धोनीनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:37 PM

Open in App

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला खास पत्र लिहिलं आहे. धोनीनं १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याबद्दल मोदींनी धोनीला खास पत्र लिहून त्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे. याशिवाय भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. धोनीनं मोदींनी लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे. त्यानं पत्रासाठी मोदींचे आभारही मानले आहेत. 'एका कलाकाराला, सैनिकाला आणि खेळाडूला कौतुक हवं असतं. त्यांच्या मेहनतीची, बलिदानाची दखल घेतली जावी, हीच त्यांची इच्छा असते. पंतप्रधान मोदीजी, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे,' असं धोनीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'तुझ्यात नव्या भारताचा आत्मा दिसतो. तरुणांचं भविष्य त्यांचं कुटुंब, आडनाव निश्चित करत नाही, तर ते स्वत: आपलं ध्येय गाठतात आणि आपली ओळख निर्माण करतात,' अशा शब्दांत मोदींनी धोनीची प्रशंसा केली आहे. '१५ ऑगस्टला तू तुझ्या स्वभावानुसार अतिशय साधेपणानं एक व्हिडीओ शेअर केलास. त्याची संपूर्ण देशात चर्चा झाली. १३० कोटी भारतीय तुझ्या निर्णयानं निराश झाले. पण गेलं दीड दशक भारतासाठी जे केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत,' असं म्हणत मोदींनी धोनीला धन्यवाद दिले. 'तुझी कारकीर्द पाहिल्यास आकडेवारीदेखील तू किती यशस्वी होतास ते सांगते. तू भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस. भारताला जगातला सर्वोत्तम संघ असा नावलौकिक मिळवून देण्यात तुझी भूमिका महत्त्वाची आहे. क्रिकेट विश्वात तुझ्या नावाचा समावेश सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये, सर्वश्रेष्ठ कर्णधारांमध्ये आणि सर्वश्रेष्ठ यष्टीरक्षकांमध्ये होतो यात तिळमात्र शंका नाही,' असंदेखील मोदींनी पत्रात म्हटलं आहे. अवघड परिस्थिती हाताळण्याचं तुझं कौशल्य, सामन्याचा शेवट करण्याची तुझी स्टाईल, विशेषत: २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पुढील कित्येक वर्षे लक्षात राहील, अशा शब्दांत मोदींनी धोनीच्या खेळाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीनरेंद्र मोदी