सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी एखादी छोटीशी व्हिडीओ व्हायरल होते तर कधी एखादं गाणं झटक्यात लोकप्रिय होतं. सध्या अशीच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल झाली आहे. केरळच्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यात एका धाडसी महिला वन अधिकाऱ्याने किंग कोब्राला अवघ्या ६ मिनिटांत मुक्त करत त्याची सुटका केली. या महिला अधिकाऱ्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या महिला अधिकाऱ्याने केलेला प्रकार हा प्रचंड जोखमीचा होता, पण संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने त्या महाकाय सापाची सुटका केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यानेही (Sachin tendulkar) या अधिकारी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
सचिनने केलं कौतुक
केरळच्या पेप्पारा अंकुमारुथुमूत निवासी भागात जंगलातील ओढ्यात आंघोळ करताना स्थानिकांना हा किंग कोब्रा दिसला होता. या विषारी सापाला पाहिल्यानंतरही पारुथिपल्ली रेंजच्या फॉरेस्ट बीट ऑफिसर रोशनी अजिबात डगमगल्या नाहीत. रोशनी यांनी अत्यंत धाडसाने त्या किंग कोब्राला रेस्क्यू केले. राजन मेढेकर यांनी एक्स वर हा व्हिडीओ ट्विट करत माहिती दिली आहे. वन अधिकारी रोशनी हिचे कौतुक करताना ''उत्साही, धाडसी आणि निडर राहणं हेच रोशनीच्या दिवसभरातील कामाचं मूल्यमापन आहे'' असे कौतुक सचिनने केले आहे. सचिन तेंडुलकरने रोशनीच्या या धाडसाला सलामीदेखील केला आहे. तसेच, आपल्या एक्स अकाऊंटवरुन सचिनने राजन मेढेकर यांनी शेअर केलेला व्हिडिओ रिट्विटही केला आहे.
जोखीम असूनही निडर राहिल्या रोशनी
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नसते. हा साप खूप चपळ असतो. त्याचा दंश जीवघेणा असतो. पण रोशनी यांनी केलेल्या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या अतिशय काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडत आहेत. कोणतीही घाई न करता रोशनी यांनी किंग कोब्राची सुटका केली.