Join us  

आधी वरिष्ठ संघात पदार्पण अन् आता खेळणार 19 वर्षांखालील वर्ल्ड कप  

कोणत्याही खेळाडूचा प्रवास हा आधी कुमार, युवा, कनिष्ठ आणि मग वरिष्ठ संघ असा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 1:22 PM

Open in App

कोणत्याही खेळाडूचा प्रवास हा आधी कुमार, युवा, कनिष्ठ आणि मग वरिष्ठ संघ असा असतो. पण, पाकिस्तानच्या एका खेळाडूचा प्रवासाची सुरुवात थेट वरिष्ठ संघाकडून झाली. पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहनं नुकतंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. आता नसीम पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज होत आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आणि त्यात नसीमला पाकिस्तानच्या युवा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

''नसीम हा आमचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्यानं युवा वर्ल्ड कप खेळावा, ही माझी इच्छा आहे,'' असे पाकिस्तानच्या युवा संघाचे प्रशिक्षक इजाझ अहमद यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले,''त्याच्याकडे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवही आहे. मायदेशात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघ फिरकीपटूंवर अवलंबून असेल. तसेच वरिष्ठ संघात मोहम्मद अब्बास व शाहीन आफ्रिदी हे दोन जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे नसीमला आता न्यूझीलंड, इंग्लंड आदी खेळपट्टींवर खेळवायला हवं. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्यासाठी मी वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल हक यांच्याकडे मागणी करणार आहे.''

पाकिस्ताननं जाहीर केलेल्या युवा संघात नसीमच्या नावाचा समावेश आहे.  गेल्या महिन्यात त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियात कसोटीत पदार्पण करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. रेकॉर्डनुसार नसीमचं वय हे 16 वर्ष व 279 दिवस इतकं आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान क्रेग यांचा विक्रम मोडला. क्रेग यांनी 1953साली वयाच्या 17व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. पाकिस्ताननं दोन वेळा युवा वर्ल्ड कप जिंकला आहे. 

टॅग्स :पाकिस्तानआयसीसी