Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिक्सिंगच्या आरोपामुळं तणावात होतो, हा राग मैदानावर काढेन - शामी

मी देशाप्रती असलेल्या प्रतिबद्धता आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केल्याने दु:खी होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 10:29 IST

Open in App

नवी दिल्ली -  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते.  या आरोपांची दखल बीसीसीआयनेही घेतली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या करारातूनही वगळले होते. पण आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआयने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सिंगचे आरोपही फेटाळले आहेत. त्यामुळे आता शामीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयनंतर शामीने माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना मार्ग मोकळा करुन दिला.

माझ्यावर खूप दबाव होता. मात्र बीसीसीआयकडून क्लीन चिट मिळाल्याने मी आनंदी आहे. मी देशाप्रती असलेल्या प्रतिबद्धता आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केल्याने दु:खी होतो. मात्र बीसीसीआयच्या चौकशी प्रक्रियेवर मला विश्वास होता. मी मैदानावर पुनरागमनाबाबत उत्साहित आहे. मागील काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी मी दबावात होतो. मी माझ्या रागाला मैदानावर सकारात्मक रूपाने बाहेर काढेन. या निर्णयाने मैदानावर चांगला खेळ करण्यास साहस आणि प्रेरणा मिळेल. बाकीच्या आरोपांमधूनदेखील मी निर्दोष बाहेर येईन असा विश्वास शामीने व्यक्त केला. 

बीसीसीआयने दिलेल्या या निर्णयानंतर येत्या ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या पर्वात शमीचा दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शमी दक्षिण आफ्रिकेतून परतताना दुबईमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले, असा आरोप हसीन जहाँने केला होता. शमी मॅच फिक्सिंग करीत असल्याचा आरोपही तिने केला होता. शमीने ३० कसोटी सामन्यात ११० आणि ५० वन डेत ९१ गडी बाद केले आहेत. आतापर्यंत सात टी-२० सामन्यात त्याने आठ गडी बाद केले.हसीनने शमीवर कौटुंबिक हिंसा व अन्य आरोप केल्यानंतर बीसीसीआयने शमीचा करार रोखला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांना शमीविरोधातील आरोपांची चौकशी करण्याची विनंती केली होती. नीरज कुमार हे बीसीसीआय भ्रष्टाचार विरोधीपथकाचेही प्रमुख आहेत. त्यांनी आपला गुप्त अहवाल सीओएला सोपविला. या आधारे सीओएने पुढील कारवाई करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. 

टॅग्स :मोहम्मद शामीबीसीसीआय