Join us  

भारतीय महिला पहिल्यांदाच खेळणार दिवस-रात्र कसोटी 

सप्टेंबरच्या मध्यावर ही मालिका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताने २००६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 9:31 AM

Open in App

नवी दिल्ली : सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणारा भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूने खेळविण्यात येणारा दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना पर्थ येथे होणार असून, येथे अद्याप एकही दिवस-रात्र कसोटी सामना खेळविण्यात आलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही (सीए) भारताविरुद्धच्या मालिकेचे कार्यक्रम जाहीर केले.

शाह यांनी ट्वीट केले की, ‘महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध असून, मला सांगण्यास आनंद होत आहे की, भारतीय महिला क्रिकेट संघ यंदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल.’ भारतीय महिला संघ १६ जूनपासून इंग्लंड येथे कसोटी सामना खेळेल. विशेष म्हणजे गेल्या ७ वर्षांत भारताचा हा पहिला कसोटी सामना ठरेल. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय महिला संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह तीन टी-२० सामन्यांची मालिकाही खेळेल. अद्याप या दौऱ्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर झाले नसून, सप्टेंबरच्या मध्यावर ही मालिका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताने २००६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ एकच दिवस-रात्र कसोटी सामना खेळविण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक १९ सप्टेंबर : पहिला एकदिवसीय सामना - नॉर्थ सिडनी, दिवस-रात्र.२२ सप्टेंबर : दुसरा एकदिवसीय सामना - जंक्शन ओव्हल.२४ सप्टेंबर : तिसरा एकदिवसीय सामना - जंक्शन ओव्हल.३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर : दिवस-रात्र कसोटी सामना - पर्थ.७ ऑक्टोबर : पहिला टी-२० सामना - नॉर्थ सिडनी ओव्हल.९ ऑक्टोबर : दुसरा टी-२० सामना - सिडनी ओव्हल.११ ऑक्टोबर : तिसरा टी-२० सामना - नॉर्थ सिडनी ओव्हल.

टॅग्स :भारत