Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडच्या 142 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच घडला 'हा' विक्रम 

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 15:31 IST

Open in App

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 269 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिकेचा पहिला डाव 223 धावांवर गडगडला. जेम्स अँडरसननं  ( 5/40) आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला, तर स्टुअर्ट ब्रॉड ( 2/38) आणि सॅम कुरण ( 2/39) यांनी त्याला योग्य साथ दिली. पण, या डावात इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं ऐतिहासिक कामगिरी केली. स्टोक्सनं इंग्लंड क्रिकेटच्या 142 वर्षांच्या इतिहासात कोणालाच न जमलेला पराक्रम केला. 

यष्टिरक्षक वगळता एखाद्या क्षेत्ररक्षकानं कसोटीच्या एका डावात पाच झेल घेण्याचा अनोखा विक्रम स्टोक्सनं नावावर केला. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूनं आफ्रिकेच्या झुबायर हम्झा, फॅफ ड्यु प्लेसिस, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, ड्वेन प्रेटोरियस आणि अॅनरीच नोर्टजे यांचा झेल घेतला. क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा स्टोक्स जगातला 12वा खेळाडू ठरला. 1936मध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या व्हिच रिचर्डसन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. 

इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात असा पराक्रम प्रथमच घडला. इंग्लंडने यापूर्वी खेळलेल्या 1019 कसोटी सामन्यांत 23 वेळा एकाच डावात 4 झेल टिपण्याचा पराक्रम नोंदवला गेला होता. गतवर्षी इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं आयर्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एका डावात चार विकेट्स घेतल्या होत्या.  

इंग्लंडने पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली आहे. अँडरसननं कसोटी क्रिकेटमध्ये 28वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.  त्यानं रवीचंद्रन अश्विन आणि इयान बॉथम यांचा एका डावात 27 वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला. सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अँडरसननं आठव्या स्थानी झेप घेतली. या विक्रमात श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुलरीधरन ( 67 वेळा) अव्वल स्थानावर आहे.  

 

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडद. आफ्रिकाजेम्स अँडरसन