Join us  

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात असा असेल भारतीय संघ, कोणाला संधी आणि मिळणार डच्चू

भारतासाठी अजून एक डोकेदुखी म्हणजे यष्टीरक्षकाची निवड करणे. कारण भारतीय संघाबरोबर सध्या दोन यष्टीरक्षक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 4:33 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी कोणत्या अकरा खेळाडूंना संघात स्थान मिळणार आणि कोणाला डच्चू, याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही संकेत दिले आहेत. सामन्यापूर्वी कोहलीची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघात कोणते ११ खेळाडू असू शकतील, याबाबत संकेत दिले आहेत.

न्यूझीलंडची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्याचबरोबर भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा हा फिट झाला आहे. त्यामुळे या सामन्यासाठी त्याला प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांचे संघातील स्थान निश्चित समजले जात आहे. त्यामुळे उमेश यादव आणि नवदीप सैनी यांना पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागेल, असे दिसत आहे.

भारताला सर्वात मोठा प्रश्न हा सलामीवीराचा आहे. कारण रोहित शर्मा जायबंदी झाल्यामुळे मयांक अगरवालला साथ देणार कोण, हा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. या गोष्टीसाठी त्यांच्यापुढे दोन पर्याय आहेत. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या दोघांचा सलामीवीरासाठी विचार केला जाऊ शकतो. गिल सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये द्विशतकही झळकावले आहे. त्यामुळे खरंतर गिलला संधी मिळायला हवी. पण पृथ्वीकडे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असल्यामुळे त्याला संधी मिळू शकते.

या सामन्यात कोहलीला संघात अष्टपैलू खेळाडूही हवे आहेत. त्यामुळे रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांना कोहली संघात स्थान देण्यासाठी प्रयत्नशील असेल. कारण आतापर्यंतच्या काही सामन्यांमध्ये या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांना निश्चितच संघात स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

भारतासाठी अजून एक डोकेदुखी म्हणजे यष्टीरक्षकाची निवड करणे. कारण भारतीय संघाबरोबर सध्या दोन यष्टीरक्षक आहेत. वृद्धिमान साहाकडे पंतपेक्षा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर गेले सलग सहा सामने तो संघाबरोबर खेळत आहे. दुसरीकडे पंतला कसोटी संघातून दूर ठेवण्यात आले होते. पण येथे झालेल्या सराव सामन्यात पंतने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या सामन्यात साहाला पसंती द्यायची की पंतला, हे संघ व्यवस्थापनाला ठरवावे लागणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीरोहित शर्मापृथ्वी शॉशुभमन गिलइशांत शर्मामोहम्मद शामीजसप्रित बुमराहरवींद्र जडेजारिषभ पंतवृद्धिमान साहा