लीड्स : हेडिंग्ले मैदानात पहिला डाव सर्वबाद ७८ धावांवर आटोपल्यावर भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात पलटवार केला आहे. रोहित शर्मा (५९ धावा) , चेतेश्वर पुजारा नाबाद ९१ आणि विराट कोहली नाबाद ४५ धावा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा ८० षटकांत २ बाद २१५ धावा केल्या होत्या.
इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यानंतर दिवसाअखेर भारत इंग्लंडपेक्षा १३९ धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी भारतीयांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पुजाराने आपल्या ९१ धावांच्या खेळीत तब्बल १५ चौकार लगावले. त्याने २२ व्या आणि २५ व्या षटकांत अँडरसनला तर २४ व्या षटकांत ओव्हरटनला चौकार लगावत जणू काही आज त्याचाच दिवस असल्याचे संकेत दिले. त्यानंतर त्याने २९ व्या षटकात पुन्हा दोन चौकार लगावले. त्याने ५१ व्या षटकांत ओव्हरटनला चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले.
तो शतकाच्या दिशने आणि कर्णधार विराट कोहली अर्धशतकाच्या दिशेने जात असतांनाच अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. ओली रॉबिन्सनने चहापानानंतर रोहित शर्माला बाद केले. तर उपहाराच्या आधीच क्रेग ओव्हरटनने राहुलला बाद केले होते. जॉनी बेअरस्टोने त्याचा दुसऱ्या स्लिपमध्ये अप्रतीम झेल घेतला.
रोहित शर्मावर भडकला विराट हसीब हमीद याच्या ३७ व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर रोहितने स्लिपमध्ये झेल सोडला. त्यामुळे कर्णधार विराट कोहली हा रोहित शर्मावर भडकला होता. बुमराहने टाकलेला हा चेंडू हसीबच्या बॅटची कड घेऊन रोहितच्या दिशेने गेला. हा झेल सोपा नव्हता. तरीही रोहितने प्रयत्न केला. त्याला झेल घेता आला नाही. रोहितच्या शेजारी विराट उभा होता. रोहितने झेल सोडल्यावर विराट संतापला. हा चौकार ठरला आणि सोबतच हसीबचे अर्धशतक पूर्ण झाले.
पंतच्या ग्लोव्ह्जवरील पट्टी पंचांनी काढलीदुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात ॲलेक्स वॉर्फ आणि रिचर्ड केटलबोरॉग यांनी पंतला त्याच्या ग्लोव्ह्जवरील टेप काढण्यास सांगितले. पंत याने चौथ्या आणि पाचव्या बोटाला टेप लावली होती. आणि एमसीसीच्या नियमानुसार हे चुकीचे आहे. नियमानुसार मधले बोट आणि अंगठा यांच्याशिवाय कोणत्याही बोटांना टेप लावता येत नाही. पंतने मालनचा झेल घेतल्यावर पंच त्याच्याजवळ गेले आणि ग्लोव्ह्जला लावलेली टेप काढण्यास सांगितले.संक्षिप्त धावफलकभारत (पहिला डाव) : ४०.४ षटकांत सर्वबाद ७८ धावा. इंग्लंड : १३२.२ षटकांत सर्व बाद ४३२ धावा (जो रुट १२१, डेव्हिड मलान ७०, हसीब हमीद ६८, रोरी बर्न्स ६१; मोहम्मद शमी ४/९५, जसप्रीत बुमराह २/५९, मोहम्मद सिराज २/८६, रवींद्र जडेजा २/८८.) भारत (दुसरा डाव) : ८० षटकांत २ बाद २१५ धावा (रोहित शर्मा ५९, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ९१, विराट कोहली खेळत आहे ४५; क्रेग ओव्हरटन १/१८, ओली रॉबिन्सन १/४०.)
पुजाराची सर्वोत्तम फलंदाजी
- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर
n पुजाराची अशी खेळी याआधी कधी पाहिली नाही. नेहमीच्या तुलनेत तो आज मोकळेपणे खेळला, जे गरजेचे होते. तरी अजून बराच खेळ बाकी आहे.n भारताला बळी वाचवायचे आहेत, वेळ घालवायचा आहे आणि धावाही काढायच्या आहेत. त्यामुळे भारताची वाटचाल आव्हानात्मक आहे.n भारतीयांची दुसऱ्या डावातील योजना जबरदस्त होती. भारताने अपेक्षित फलंदाजी केली आणि डब्ल्युटीसी अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच भारताची लौकिकानुसार फलंदाजी केली.n सर्वात महत्त्वाचे म्हणजे विराट कोहली - पुजारा यांच्या बॅटमधून धावा निघाल्या. दोघेही दडपणाखाली दिसले नाही.n ३५४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतरही भारताने इतकी चांगली खेळी केल्याने आता विजयाची अंधूक आशा निर्माण झाली आहे. यासाठी पाचव्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत तरी फलंदाजी करावी लागेल.n पुजाराने मोक्याच्यावेळी आपला दर्जा सिद्ध केला.n चौथ्या दिवशीही भारताने पूर्ण वेळ भारताने फलंदाजी केल्यास लॉर्ड्ससारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.