Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शामीवर पत्नीने केले बलात्कार आणि खुनाचे आरोप, एफआयआर दाखल

शामीच्या भावासोबत मला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं गेलं. त्याचबरोबर शामीची आई आणि बहिण यांनी जेवणातून माझ्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न केला होता, असे खळबळजनक आरोप हसीनने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 19:14 IST

Open in App
ठळक मुद्देशुक्रवारी हसीनने शामी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात लाल बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. 

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शामीची पत्नी हसीन जहाँ गेले दोन दिवस शामीवर गंभीर आरोप करत होती. पण शुक्रवारी मात्र हसीनने शामी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात लाल बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे.

शामीचे बऱ्याच देशांमधील स्त्रीयांबरोबर अनैतिक संबंध आहेत. शामीची पाकिस्तानमध्ये अलिशाबा ही प्रेयसी आहे. दक्षिण आफ्रिकेमधून शामी तिच्याबरोबर दुबईला गेला होता. तिथे दोघांनी काही काळ एकाच रुममध्ये व्यतित केला होता. त्याचबरोबर तिच्याकडून शामीने काही पैसेही घेतले होते. शामी हा देशाची फसवणूक करत आहे, असे आरोप हसीनने शामीवर केले होते. पण शुक्रवारी पुराव्यांसह हसीनने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पतीकडून किंवा कुटंबातील अन्य व्यक्तींकडून  अत्याचार, घातपात करण्याचा प्रयत्न, खूनाचा प्रयत्न, बलात्कार करणे, खाण्यातून विषप्रयोग करणे, धमकावणे, कुटुंबियांतील व्यक्तींनी एकत्रितपणे त्रास देणे, असे आरोप हसीनने लगावले आहेत. या आरोपपत्रामध्ये शामीसहीत त्याची आई, बहिण, भाऊ आणि वहिनी यांची नावे देण्यात आली आहेत. शामीने माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याच्या भावाने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. शामीच्या भावासोबत मला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं गेलं. त्याचबरोबर शामीची आई आणि बहिण यांनी जेवणातून माझ्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न केला होता, असे खळबळजनक आरोप हसीनने केला आहे. 

हसीनने हे आरोप केल्यावर शामीने आपली बाजूही मांडली आहे. याप्रकरणी तो म्हणाला की, " माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. गेल्या पाच वर्षांपासून तिच्यावर अत्याचार होत आहे, असे हसीनने आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. पण आमच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. जर तिच्यावर पाच वर्षांपासून अत्याचार होत होते, तर ती यावेळी का हे सारे आरोप करत आहेत. यापूर्वी तिने हे आरोप का केले नाहीत? हे माझ्याविरुद्ध केलेले कारस्थान आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमांवरून जेव्हा हसीनवर टीका केला जात होती, तेव्हा मी तिच्या पाठिशी होतो आणि यापुढेही तिच्या पाठिशी उभा राहीन."

टॅग्स :मोहम्मद शामीक्रिकेट