लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए)च्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यावर दिलेली स्थगिती उठवित मुंबई उच्च न्यायालयाने अखेरीस १२ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यकारिणी निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. मतदार क्लबची नोंदणी कायद्यानुसार करण्याची हमी ‘एमसीए’ने दिलयानंतर न्या. रियाझ छागला व न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आणि ‘एमसीए’च्या संमतीने शुक्रवारी याचिका निकाली काढली.
‘एमसीए’ निवडणूक अधिकाऱ्यांनी २४ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली होती. यावर ‘एमसीए’चे माजी सदस्य श्रीपाद हळबे आणि काही अन्य सदस्यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हरकती कोणतेही कारण न देता फेटाळून थेट अंतिम यादी जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे कोणत्या आधारावर या हरकती नाकारल्या, याचे स्पष्टीकरण न्यायालयाने या अधिकाऱ्यांकडून मागवावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानुसार ‘एमसीए’ने गुरुवारच्या सुनावणीत कारणे देणारे आदेश न्यायालयात सादर केले.
न्यायालयाने याचिका निकाली काढताना याचिकाकर्त्यांना आवश्यकता भासल्यास नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा दिली. त्यामुळे आता ‘एमसीए’ निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, ही निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी पार पडेल. यानंतर निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी पात्र उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर केली. त्याचप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी ८ ते १० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ४:०० वाजेपर्यंतची मुदतही दिली आहे.
आठ जणांमध्ये चुरस
‘एमसीए’चे मावळते अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह आठ उमेदवारांचे अर्ज अध्यक्षपदासाठी पात्र ठरले. यामध्ये माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, शाहआलम शेख, सुरज सामत आणि विहंग सरनाईक यांचा समावेश आहे.