चेन्नई : आॅस्ट्रेलिया संघात काही दमदार क्षेत्ररक्षक आहेत. त्या जोरावर आॅस्ट्रेलिया भारताविरोधात कधीही बाजी पलटू शकतो, असे आॅस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅविस हेड याने म्हटले आहे.
हेड याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘क्षेत्ररक्षणाद्वारे तुम्ही सामना जिंकू किंवा हरू शकता. आॅस्ट्रेलिया संघाला आपल्या क्षेत्ररक्षणावर अभिमान आहे आणि आम्ही या कौशल्यावर मेहनतदेखील घेतली आहे. त्यामुळे आम्हाला दबावाच्या परिस्थितीत सर्वोच्च क्षेत्ररक्षण करावे लागेल. आमच्याकडे काही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या जोरावर आम्ही सामना जिंकू शकतो.’ हेड याने सांगितले की, ‘फलंदाजीत वरचा क्रम मिळाल्याने मी आनंदी आहे. १७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया एकदिवसीय मालिकेतही असे करण्यात आनंदी आहे.’
फिंचच्या दुखापतीत वाढ : आॅस्ट्रेलियाई सलामीचा फलंदाज अॅरोन फिंचच्या डाव्या पायाच्या मांसपेशीत आज सराव सत्रात पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. फिंच चिंदबरम स्टेडियममध्ये झालेल्या सरावसत्रात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो पुढे सराव करू शकला नाही. फिंच जर सामन्यात खेळू शकला नाही तर त्याच्या जागी ट्रेव्हिस हेड किंवा हिल्टन कार्टराइट हे वॉर्नरच्या साथीने सामन्याला सुरुवात करू शकतात.