जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जशास तसे उत्तर देण्यात आले. भारताकडून बुधवारी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील नऊ ठिकाणांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य करण्यात आले, यात मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली असताना बांगलादेशच्या मनातही भिती निर्माण झाली. बांगलादेशने पाकिस्तानमध्ये पीएसएल खेळणाऱ्या खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली.
पाकिस्तानमध्ये पीएसएलचा दहावा हंगाम खेळला जात आहे. या लीगमधील अजूनही बरेच सामने बाकी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने क्रिकेट बोर्ड पीएसएल त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यावर ठाम आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बांगलादेशला सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या आणि पीएसएल खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंची चिंता वाटू लागली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला आहे आणि पीएसएलमध्ये खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल विचारणा केल्याची माहिती आहे.
बांगलादेशचा लेग- स्पिनर रिशाद हुसेन लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे. तर, वेगवान गोलंदाज नाहिद राणा पेशावर झल्मीचा खेळाडू आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'खेळाडूंच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील याची खात्री करण्यासाठी ते पीसीबी आणि इस्लामाबादमधील त्यांच्या उच्चायुक्तांच्या संपर्कात आहेत.'
बांगलादेशचा पाकिस्तान दौरा रद्द होण्याची शक्यतालवकरच बांगलादेश क्रिकेट संघही पाकिस्तानचा दौरा करणार आहे, जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. ही मालिका येत्या २५ तारखेपासून खेळली जाणार आहे. सध्या बांगलादेशचे दोनच खेळाडू बांगलादेशात आहेत. त्यानंतर संपूर्ण बांग्लादेश क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार आहे. ही मालिका देखील रद्द होण्याची शक्यता आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले?बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, बांगलादेशचा संघ पाकिस्तानला दौरा करेल की नाही? हे तिथली परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सध्या नाहिद राणा आणि रियाज हुसेन यांची चिंता आहे, जे सध्या पाकिस्तानात आहेत.