सध्या ड्रीम ११, माय ईलेव्हन सर्कल सारख्या अॅप्सवर आयपीएलची टीम बनविण्याचा छंद लोकांना जडला आहे. टीम बनवा आणि कोटी कोटींची बक्षिसे जिंका अशा जाहिराती भारताचे खेळाडू करत सुटले आहेत. आता या गोष्टी म्हणजे जुगारच, पण व्हाईट कॉलरवाला असल्याने खुलेआम सारे सुरु आहे. अशातच शेतकऱ्याच्या मुलाचे नशीब फळफळले आहे. त्याला १ कोटींचे बक्षीस लागले आहे.
छत्तीसगडच्या सरगुजा संभागच्या जशपूर जिल्ह्यातील पत्थलगावातील एका शेतकरी पुत्राला ही लॉटरी लागली आहे. जगन्नाथ सिदार असे त्याचे नाव आहे. त्याने ड्रीम ईलेव्हनवर १ कोटी रुपये जिंकले आहेत. हे पैसे त्याने आयपीएलवर नाही तर २३ मार्चला झालेल्या न्यूझीलंड वि. पाकिस्तान मॅचवर जिंकले आहेत. त्याने जी टीम बनविलेली त्यावर त्याचे ११३८ पॉईंट झाले आणि त्याला १ कोटी रुपये मिळाले आहेत. आता एकदम ही रक्कम काही त्याच्या खात्यावर आलेली नाहीय.
जगन्नाथने आतापर्यंत सात लाख रुपये काढले आहेत. अजून उर्वरित पैसे थोड्या थोड्या टप्प्याने येत आहेत. हे पैसे जिंकल्यानंतर त्याने गावात पेढे वाटले आहेत. या पैशातून तो काय काय करणार याची माहिती त्याने दिली आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून तो घर बांधत होता, आता या पैशांतून तो पक्के आणि थोडे मोठे घर बांधणार आहे. आजारी वडिलांवर उपचार करणार आहे. तसेच कार, सोने-नाणे नाही तर तो शेतीसाठी एक ट्रॅक्टर घेणार आहे. शेती करणे सोपे जावे यासाठी तो हे करणार आहे. जगन्नाथने ड्रीम ईलेव्हनवर एवढे पैसे जिंकल्याचा एक मोठा साईडईफेक्टही समोर येत आहे. आता त्याचे पाहून गावातील, आजुबाजुच्या पंचक्रोशीतील लोकही आयपीएल, क्रिकेट सामन्यांवर पैसा लावणार आहेत. सर्वांनाच जगन्नाथसारखे जिंकणे किंवा पैसे कमविणे शक्य नाहीय, यात अनेकजण बरबाद मात्र जरूर होणार आहेत.