नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२२च्या ४१व्या सामन्यात पाकिस्ताननेबांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली. खरं तर हा सामना पाकिस्तानने जिंकला पण अनेक नाट्यमय घडामोडींमुळे सामना चर्चेत राहिला. पाकिस्तानी संघाने रडीचा डाव खेळला असल्याचे चाहते म्हणत आहेत. नाट्यमय घडामोडींमुळे आता सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाला चीटर म्हणून संबोधले जात आहे. ही घटना शाकिब अल हसनच्या वादग्रस्त विकेटशी संबंधित आहे.
सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
दरम्यान, बांगलादेशच्या डावात १७व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शाकिब अल हसनला शादाब खानच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद देण्यात आले. शाकिबने देखील अम्पायरच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि त्याने तातडीने डीआरएसची मागणी केली. अशा स्थितीत रिप्ले पाहिल्यावर अल्ट्राएजमध्ये दिसणारा स्पाइक बॅटला आदळणाऱ्या चेंडूचा की बॅट जमिनीवर आदळणाऱ्याचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या घटनेवर तिसऱ्या अम्पायरने स्पष्ट केले की शाकिबची बॅट जमिनीवर आदळली होती, त्यामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले. आता या घटनेशी संबंधित स्क्रीनशॉट चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर केला जात असून पाकिस्तानी संघावर चीटिंग केल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानी संघाविरूद्ध सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
लक्षणीय बाब म्हणजे अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत भिडणार आहेत, तर पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
पाकिस्तानच्या मदतीला नेदरलॅंड्स आला धावून
दक्षिण आफ्रिकेचा पराभव केवळ पाकिस्तानसाठी आवश्यक नव्हता तर नेदरलँडसाठीही तो खूप महत्त्वाचा होता. कारण यानंतर हे कॉम्बिनेशन केले जात होते की जर पाकिस्तानने बांगलादेशला हरवले तर नेदरलँड्स पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर येईल. जे त्यांना पुढील टी-२० विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यासाठी मदतशीर असेल. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स सामन्यानंतर म्हणाला, "आणखी एक चांगला अनुभव आला, नेदरलँड्सच्या संघाने आणखी एक मोठी उलटफेर केली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर, आमच्यासाठी लक्ष्य हे होते की आम्ही अजूनही पुढील विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी खेळत आहोत. त्यामुळे दोन निकाल आमच्या बाजूने आले."
पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ केवळ १४५ धावा करू शकला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.