भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान हा क्रिकेटच्या मैदानात छाप सोडून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या क्रिकेटर्सपैकी एक आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत (IPL 2025) तो रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स संघात मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तो संघाच्या ताफ्यात जॉईन झाला. फ्रँचायझी संघानं झहीर खानवरील प्रेम आजही कायम आहे हे दाखवण्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात २० वर्षांपूर्वी पाहायला मिळालेला अन् गाजलेला लव्ह प्रपोजल अँगल दिसून येतोय.
२० वर्षांपूर्वी मिस्ट्री गर्लचं प्रपोज अन् झहीरचा फ्लाइंग किस
२००५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टीव्हीएस मालिके दरम्यानचा झहीर खान आणि स्टँडमधील एका मिस्ट्री गर्लचा एक व्हि़डिओ चांगलाच व्हायरल झाला होता. स्टँडमध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सुंदरीनं 'झहीर आय लव्ह यू ' असं लिहिलेली प्रेमाची पाटी (पोस्टर) दाखवत क्रिकेटरवरील प्रेम व्यक्त केले होते. तिच्या या प्रपोज नंतर ड्रेसिंग रुममध्ये युवराज सिंगनंही झहीरची थट्टा मस्करी केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. एवढेच नाही तर झहीर खान याने चाहतीला फ्लाइंग किस दिला अन् हे प्रपोजल चांगले गाजले. त्यात आता नव्या व्हिडिओची भर पडलीये.
झहीर खानला जुन्या अंदाजात तिनं पुन्हा केलं प्रपोज, मग...
LSG च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जो व्हिडिओ शेअर करण्यात आलाय त्यात झहीर एका अलिशान कारमधून उतरताना दिसते. हॉटेलमध्ये एन्ट्रीनंतर एक महिला चाहती ' झहीर आय लव्ह यू' असं लिहिलेले पोस्टर दाखवत पुन्हा एकदा क्रिकेटरवर २० वर्षां पूर्वीपासूनच प्रेम कायम असल्याचे दाखवून दिताना दिसते. ही महिला चाहती २० वर्षांपूर्वी स्टँडमध्ये बसेलेली होती तीच असावी, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसते. पण फ्रँचायझी संघानं मात्र यासंदर्भात अधिक माहिती दिलेली नाही.