मुंबई: भारतीय संघ पुढील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंडचा मुकाबला करेल. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेली पहिलीवहिली स्पर्धा जिंकेल. इंग्लंडमध्ये होत असलेल्या या महामुकाबल्याआधी विराट कोहली क्वारंटिनमध्ये आहे. या कालावधीत विराट चाहत्यांशी संवाद साधत असून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.
विराट कोहलीनं महेंद्रसिंग धोनीकडून भारतीय संघाची धुरा स्वीकारली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा (२००७), एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (२०११) आणि चॅम्पियन्स करंडक (२०१३) या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धां जिंकणारा एकमेव कर्णधार अशी धोनीची ओळख आहे. या तिन्ही स्पर्धा जिंकताना धोनीनं त्याचे नेतृत्वगुण दाखवून दिले. विराटच्या नेतृत्त्वाखाली मात्र भारताला अद्याप तरी आयसीसीकडून आयोजित एकाही स्पर्धेचं जेतेपद मिळालेलं नाही. त्यामुळे अनेकजण विराटच्या नेतृत्व शैलीवर टीका करतात.
![]()
विराट आणि धोनीमध्ये वाद असल्याची चर्चा अनेकदा होते. क्रिकेटपटू म्हणून विराट आणि धोनीचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांचे नेतृत्त्वगुण यांची चर्चा खूपदा रंगते. त्यामुळेच की काय एका क्रिकेट चाहत्यानं इन्स्टाग्रामवर विराटला धोनीसोबतच्या त्याच्या नात्याचं वर्णन केवळ दोन शब्दांत करायला सांगितलं. त्यावर विश्वास, आदर असं मन जिंकणारं उत्तर विराटनं दिलं. सध्या क्वारंटिन असल्यानं विराट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे.