Join us

Faf du Plessis: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अपेक्षा अवास्तव असायच्या, फाफ डुप्लेसिसचा आरोप

Faf du Plessis: टी-२० विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यावर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू फाफ डुप्लेसिसने याबाबत भाष्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 07:43 IST

Open in App

जोहान्सबर्ग : टी-२० विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यावर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू फाफ डुप्लेसिसने याबाबत भाष्य केले आहे. तो म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या खेळाडूंकडून खूपच अवास्तव अपेक्षा असायच्या. कोणत्याही वेळी खेळाडू हा संघासाठी उपलब्ध असायलाच हवा, हा त्यांचा अट्टहास होता.’ फाफ डुप्लेसिसने टी-२० विश्वचषकापूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने तब्बल ६३३ धावा केल्या होत्या. अगदी थोड्याच फरकाने त्याची ऑरेंज कॅप हुकली होती. मात्र असे असूनही त्याला द. आफ्रिकेच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. डुप्लेसिस पुढे म्हणाला, ‘मागच्या वर्षी जेव्हा मी इंग्लंडविरुद्ध आफ्रिकेकडून सामना खेळत होतो, तेव्हा माझी पुढची योजना तयार होती. मला आफ्रिकेकडून टी-२० विश्वचषक खेळायचा होता. विशेष म्हणजे मला संघाचे नेतृत्व देण्यात येईल अशी चर्चापण होती. मात्र क्रिकेट बोर्ड आणि माझ्यातील काही गोष्टी अचानक बदलल्या; त्यामुळे मला देशाबाहेरील लीग सामने खेळण्याची परवानगी देणे त्यांना कठीण होऊन बसले. कसोटीतून निवृत्त होण्यालाही एक कारण होते. कारण सतत सामने खेळूनही एखाद्या मालिकेसाठी खेळाडूंनी विश्रांती घ्यायची नाही, अशी बोर्डाची अपेक्षा असायची.

 त्यामुळे मला आणि इम्रान ताहीरसारख्या खेळाडूंना या अटी जाचक वाटल्या; कारण आम्ही जगभर इतर लीगचे सामनेही खेळत असतो. त्यामुळे आता बोर्ड आणि आमच्यासारख्या खेळाडूंसमोर हेच आव्हान आहे की, या गोष्टीवर तोडगा कसा काढायचा?’ आफ्रिकेच्या ३७ वर्षीय या खेळाडूला त्याच्या वाढत्या वयाचा मुद्दा गौण वाटतो. याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘शारीरिकदृष्ट्या मला अजूनही मी पूर्ण तंदुरुस्त वाटतो. क्रिकेटकडून मिळणारी प्रेरणाही याला कारणीभूत आहे.’ संघातील फाफच्या समावेशाबाबत मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर अजूनही आशावादी आहे. त्यांना वाटते की, संघाचे दरवाजे फाफसाठी अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाहीत. हा फक्त वेळेच्या नियोजनाचा प्रश्न आहे. कोविडमुळे सगळ्यांसाठी गोष्टी खूप कठीण झाल्या आहेत. मात्र मला त्याच्या भावनांचा आदर आहे, असे बाऊचर म्हणाले.

टॅग्स :द. आफ्रिकाआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App