- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
विराट कोहलीने न्यूझीलंडकडून ०-२ ने झालेल्या कसोटी पराभवास कुठलेही कारण नसल्याचे सांगितले. अशा दारुण पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्यवस्थापन आत्मपरीक्षण करेल, असा विश्वास आहे. पुढील डिसेंबरपर्यंत संघाला कुठलीही कसोटी मालिका खेळायची नाही, ही त्यातल्या त्यात सामनाधानी बाब ठरावी. तरीही ऑस्ट्रेलियाकडून अपमानस्पद पराभव होऊ नये यासाठी न्यूझीलंडमधील कथेची पुनरावृत्ती टाळावीच लागेल.
फलंदाज स्वत:च्या उणिवांवर गंभीर विचार करतील अशी अपेक्षा आहे. मुख्य ताकद असलेली फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तेथील परिस्थिती आणि आव्हान सोपे नव्हते हे समजू शकतो. तरीही कुठलाही प्रतिकार न करता गुडघे टेकणे योग्य आहे का?
न्यूझीलंडचे डावपेच ठरले होते. स्विंग आणि आखूड टप्प्याच्या चेंडूंना त्यांनी प्रमुख शस्त्र बनवले. ख्राईस्टचर्चच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान अजिंक्य रहाणेचा केविलवाणा खेळ भारतीय संघाच्या अपयशाचा नमुना होता. जगातील अनेक मैदानावर फलंदाजी करण्याचा अनुभव असलेला रहाणे कायले जेमिसन आणि नील वॅगनर यांच्या आखूड टप्प्याच्या चेंडूपुढे हतबल झाला होता. यावर मात करण्यासाठी आक्रमकपणा अवलंबत होता. अजिंक्यची ही भूमिका पूर्णपणे चुकीची होती.
भारताच्या अपयशाचे दुसरे कारण फलंदाजांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती. विराट दुसºया सामन्यात दोन्हीवेळा एकसारखा पायचित झाला. मयांक अगरवाल ट्रेंट बोल्टच्या इनस्विंग चेंडूवर दोन्हीवेळा फसला. पृथ्वी शॉही दोन्ही वेळा यष्टिमागे झेल देत परतला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रयोगांना कुठलेही स्थान नसते हे माझ्या मित्रांनी ध्यानात ठेवावे.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांमधील तांत्रिक आणि मानसिक उणिवा हेरल्या. टी२० मालिकेदरम्यान या दोन्ही गोष्टी भारतीय संघाकडे ताकदीच्या रुपाने उभ्या होत्या . जसप्रीत बुमराहला पुनरागमन करताना छान वाटले. भारताच्या खराब कामगिरीसाठी गोलंदाजांना दोष देणे योग्य नाही. फलंदाज धावा काढू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
ख्राईस्टचर्चच्या दुसºया कसोटीत मात्र आपले गोलंदाज टॉम लॅथम-डटॉम ब्लंडेल यांच्यातील मोठी भागीदारी थोपवू शकले असते. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांचा यशस्वी प्रतिकार करीत तळाच्या स्थानाला जेमिसनसह अन्य फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळून संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. (गेमप्लान)