आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने मुंबईकर अजिंक्य रहाणेवर नेतृत्वाची जबाबदारी दिली. मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनसोल्डचा टॅग लागल्यावर अखेरच्या टप्प्यात केकेआरच्या संघानं १ कोटी ५० लाख या मूळ किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. मोठी किंमत दिली त्याला कॅप्टन करण्याची हिंमत न दाखवता KKR नं लो बजेट कॅप्टन का निवडला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागचं कारण या संघाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत २३ कोटी ७५ लाख एवढी मोठी रक्कम मोजलेल्या व्यंकटेश अय्यरच नाव आधी आघाडीवर होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजिंक्य रहाणेला कर्णधार का केलं? KKR सीईओ म्हणाले...
आता केकेआरच्या ताफ्यातील आतली गोष्ट समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सीईओ व्यंकी मैसूर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत संघानं अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्यामागची स्टोरी सांगितली आहे. ते म्हणाले आहेत की, आयपीएल ही एक मोठी आणि थरारक अनुभव देणारी स्पर्धा आहे. व्यंकटेश अय्यर हा संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. पण नेतृत्वाची जबाबदारी एक मोठं आव्हान असते. त्यासाठी परिपक्व आणि अनुभव गरजेचा असतो. हा विचार करूनच संघाने अजिंक्य रहाणेवर ही जबाबदारी सोपवली आहे, असे केकेआर फ्रँचायझीचे सीईओ म्हणाले आहेत.
अन् KKR नं खेळला मास्टर स्ट्रोक
अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये कॅप्टन्सीचा अनुभव आहे. एवढेच नाही तर त्याने ११ सामन्यात टीम इंडियाचेही नेतृत्व केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाचे नेतृत्वही करताना दिसते. याच सर्व गोष्टींचा विचार करून कोलकाता नाइट रायडर्सच्या संघानं त्याच्यावर मोठा डाव खेळला आहे.
तो संघाला चॅम्पियन करेल, असाही व्यक्त केला विश्वास
अजिंक्य रहाणेनं १८५ आयपीएल सामन्यासह २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पहिल्या हंगामापासून तो आयपीएलचा भाग आहे. त्याने भारतीय संघाचेही नेतृत्व केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजीत मुंबईला 'अच्छे दिन' दाखवण्याचा पराक्रमही त्याने करून दाखवलाय. त्याचा हा अनुभव केकेआरसाठी यंदाच्या हंगामात निश्चितच फायदाचा ठरेल, असा विश्वास व्यंकी मैसूर यांनी व्यक्त केला आहे.