Join us  

Exclusive: ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 नव्हे, तर 20 संघ खेळणार!

ऑस्ट्रेलियात यावर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 9:59 AM

Open in App

ऑस्ट्रेलियात यावर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. टीम इंडियानं वर्षातील पहिलीच ट्वेंटी-20 मालिका जिंकून वर्ल्ड कपसाठीची तयारी दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. ट्वेंटी-20 स्पर्धेची क्रेझ लक्षात घेता आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधील संघांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत 16 ऐवजी 20 संघ खेळताना दिसणार आहेत.

सध्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे, परंतु यापुढील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 20 संघ खेळवण्याचा विचार आयसीसी करत आहे आणि त्याबाबतची चर्चाही सुरु आहे. 2023-2031 या कालावधीत 2024मध्ये पहिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल आणि त्यात 20 संघ खेळतील. त्यामुळे स्पर्धेच्या फॉरमॅटमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. 

यापैकी एक सोपा फॉरमॅट म्हणजे पाच संघांची चार गटात विभागणी, अव्वल दोन संघ बाद फेरीत अन् त्यानंतर उपांत्य व अंतिम फेरी, असे सामने खेळवण्यात येतील. दुसरा पर्याय म्हणजे, क्रमवारीत आघाडीवर असलेले संघ मुख्य स्पर्धेत थेट पात्र ठरतील, तर अन्य संघ पात्रता फेरीतून आगेकूच करतील. 

फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतली संघ संख्या 32हून 48 करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि त्याच धर्तीवर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील संघ संख्या वाढवण्याचा विचार आहे. अमेरिकेत ट्वेंटी-20 क्रिकेटचा चांगली पसंती मिळत आहे आणि तेथील प्रेक्षक व बाजारपेठेत जम बसवण्यासाठी आयसीसीचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळेच संघ संख्या वाढवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे.  त्याशिवाय ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी पद्धतीनं स्पर्धा घेण्याचा विचारही आयसीसी करत आहे.  

टॅग्स :आयसीसीआयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020