Join us  

भारताच्या वन डे वर्ल्ड कप संघात शिखर धवन, चहल-अश्विनवर काट; माजी सलामीवीराने निवडला संघ

Team India's World Cup 2023 Squad : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 7:41 PM

Open in App

Team India's World Cup 2023 Squad : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे. भारतासह बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान यांच्यासह श्रीलंका आणि नेदरलँड्सही आता भारतात येणार आहे. भारताचा आयसीसी स्पर्धा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI नेही कंबर कसली आहे आणि निवड समितीचे नवीन प्रमुख अजित आगरकर यासंदर्भात चर्चेसाठी विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

आशियाई स्पर्धेसाठी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या संघातून अनुभव फलंदाज शिखर धवन याचे नाव अजित आगरकरने वगळले. पण, याची एक दुसरी बाजू म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात अजूनही त्याचा विचार होऊ शकतो. २०२२ नंतर धवन वन डे क्रिकेट खेळलेला नाही. शुबमन गिलने या कालावधीत वन डे संघातील त्याचे स्थान मजबूत केले. अशात वर्ल्ड कप स्पर्धेत धवनचे खेळणे जवळपास संकटात आहे. २०१९च्या वर्ल्ड कप नंतर शिखर धवनने  ३७ वन डे सामन्यांत ४१.०३ च्या सरासरीने १३१३ धावा केल्या आहेत आणि त्यात १२ अर्धशतकांचा समावेश आहे. 

धवनचे नाव वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून बाद असताना भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर याने त्याच्या वर्ल्ड कप संघात गब्बरला स्थान दिले आहे. Jio Cinema वर बोलताना जाफरने त्याचा वर्ल्ड कप संघ जाहीर केला. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल या फलंदाजांसह हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनला त्याने निवडले आहे. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी व शार्दूल ठाकूर हे गोलंदाज जाफरच्या संघात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आर अश्विन, इशान किशन, युझवेंद्र चहल यांना स्थान दिले गेलेले नाही.  

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचं वेळापत्रक ८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला२९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ२ नोव्हेंबर - भारत वि. श्रीलंका, मुंबई५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता११ नोव्हेंबर - भारत वि. स्कॉटलंड, बंगळुरू 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपशिखर धवनवासिम जाफर
Open in App