सुनील गावसकर लिहितात...
रांचीमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने टी-२० मालिकेतही आॅस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखले. विशेषत: भारतीय फिरकीपटूंनी आॅस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. टी-२० फॉर्मेटमध्ये फलंदाजाला स्थिरावण्यास फार कमी वेळ असतो. पण, तरी आॅस्ट्रेलियन फलंदाज यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यास संघर्ष करीत आहेत. कर्णधार स्मिथ दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याने आता सर्व दारोमदार फिंच व वॉर्नर या सलामी जोडीवर आहे. हे दोन्ही सलामीवीर फ्लॉप झाले तर आॅस्ट्रेलियाला संकटातून बाहेर पडणे कठीण जाईल.
अलीकडच्या कालावधीत सूर मारून चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात स्मिथसह अनेक खेळाडू खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. अशा स्थितीत स्मिथ, कोहलीसारख्या खेळाडूंनी एक धाव वाचविण्यासाठी जोखीम पत्करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. टी-२० प्रकारात प्रत्येक धाव महत्त्वाची असते हे जरी खरे असले तरी ती धाव वाचविण्याच्या प्रयत्नात खेळाडूला काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरही राहावे लागू शकते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील मैदाने टणक आहेत. मैदान हिरवेकंच दिसत असले तरी आतून मात्र टणक असतात. त्यामुळे खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचा धोका बळावतो. यापूर्वी अॅश्टन एगरच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे सपोर्ट स्टाफने काही योजना आखली असावी आणि खेळाडूंसोबत एक धाव वाचविण्याबाबत चर्चा केली असावी.
रांची क्रिकेट मैदानावरील कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी पाऊस सुरू झाल्यानंतर मैदानावर कव्हर टाकण्यास आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू करण्यास उशीर केला नाही. त्याचसोबत मैदानावरील समालोचन कक्ष देशातील सर्वोत्तम समालोचन कक्ष आहे. येथे खेळाचे विश्लेषण उत्तमपणे करता येते. आशिष नेहराला न खेळविण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. त्याची निवड करण्याचे औचित्य काय आहे? अशा स्थितीत एखाद्या युवा खेळाडूला संधी देणे अधिक सयुक्तिक ठरले असते. त्याला ड्रेसिंग रूममधील वातावरणासोबत जुळवून घेता आले असते आणि सिनिअर्सकडून बरेच काही शिकायलाही मिळाले असते. ब्रेकचा काहीच प्रभाव होत नसल्याचे शिखर धवनने सिद्ध केले आहे. त्याने कर्णधाराच्या साथीने काही चांगले फटके खेळले. भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी आॅस्ट्रेलियन संघाला आपल्या खेळाचा दर्जा उंचवावा लागेल. दरम्यान, वन-डे मालिकेत मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आॅस्ट्रेलियन खेळाडू
टी-२० मालिका झटपट संपवून मायदेशी परतण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते. (पीएमजी)