Join us  

‘प्रत्येक कसोटी सामना अखेरचा समजून खेळतो’

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कर्णधार विराट कोहलीनेही हनुमाच्या खेळाचे कौतुक केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 3:40 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘माझ्यात कुठल्याही मंत्रमुग्धतेंचा संचार होऊ नये, याची काळजी घेत प्रत्येक कसोटी सामना अखेरचा समजूनच खेळतो,’ असे मत २५ वर्षीय कसोटी फलंदाज हनुमा विहारीने एका मुलाखतीत मांडले. आंध्रच्या या खेळाडूने विंडीजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने मिळविलेल्या विजयात २९१ धावांचे योगदान देत रोहित शर्माऐवजी स्थान देण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरविला. विहारीने स्वत:च्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, ‘मालिकेत मी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. मी एकावेळी एका कसोटी सामन्याचा विचार करतो. प्रत्येक सामना अखेरचा सामना आहे असे समजूनच मी मैदानात उतरतो. असा विचारामुळे प्रत्येक वेळी चांगली खेळी करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळत जाते.’

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कर्णधार विराट कोहलीनेही हनुमाच्या खेळाचे कौतुक केले होते. ‘संघ व्यवस्थापन आणि कर्णधार तुमच्यावर विश्वास दाखवतो आणि तो तुम्ही सार्थ करुन दाखवता यासारखी चांगली भावना कोणत्याही खेळाडूसाठी नसेल. विराटने माझे कौतुक केले. हा माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट क्षण होता,’ असे तो म्हणाला. विंडीज दौऱ्यात विहारीने एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली. सहा कसोटी सामन्यात एका शतकासह ४५६ धावा करणारा हा खेळाडू पुढे म्हणाला,‘हे वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. भारतासाठी खेळण्याआधी मी ६० प्रथमश्रेणी सामने खेळलो. आव्हानांचा छातीठोक सामना करण्याची माझ्यातील क्षमता माझा खेळ बहरवते.’

‘आॅस्ट्रेलियात मेलबोर्न येथे डावाचा प्रारंभ करणे हा माझ्या मानसिकतेचा भाग होता. मी स्वाभाविक सलामीवीर नाहीच. माझ्यासाठी हे आव्हान होते. रात्रभर रडण्याऐवजी मैदानात जात आव्हानांना सामोरे जाणे मला पसंत आहे,’ असेही विहारी म्हणाला. विहारी हैदराबादचा आहे, पण त्याची फलंदाजी शैली मात्र व्हीव्हीएस लक्ष्मण तसेच मोहम्मद अझहरुद्दीन यांच्यापेक्षा वेगळी आहे. नेहमी बचावात्मक खेळावर फोकस करण्यावर मी भर देत असल्याचे सांगताना हनुमा विहारी म्हणाला की, ‘बचावात्मक तंत्र योग्य असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही गोलंदाजाचा यशस्वी सामना करता येतो. तुम्ही आक्रमक खेळत असाल तर गोलंदाजाला संधी मिळते.’ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिज