Join us  

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 23 जूनपासून कसोटी मालिका होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:21 AM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. पण, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड पुढाकार घेऊन मालिका आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. खेळाडूंच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊन इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड मालिका आयोजन करणार आहे. पण, त्यांनी सुरक्षिततेसाठी आखलेली नियमावली भारतीय क्रिकेटपटूंसाठी योग्य नसल्याचे मत भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडनं व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) वेळापत्रक पाहता ते शक्यही नाही, असेही द्रविड म्हणाला.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 23 जूनपासून कसोटी मालिका होण्याची शक्यता आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांपासून 9 आठवडे दूर राहून स्वतःला आयसोलेट करावे लागणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाही अशाच प्रकारची बायो-बबल निर्माण करण्याचा विचार करत आहेत, परंतु भारतीय क्रिकेटपटूंसाठी हे काम करेल, असे द्रविडला वाटत नाही.''इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून जो प्रस्ताव ठेवण्यात येत आहे, तो प्रत्यक्षात उतरणं थोडं अवघड आहे. क्रिकेट मालिका खेळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडील हा क्रिकेट हंगाम आहे. त्यांनी बायो-बबल निर्माण करून यश मिळवलं, तर सर्व संघांनाच त्याची अंमलबजावणी करणं अवघड आहे,''असे मत द्रविडने युवा या स्वयंसेवी संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रमात द्रविडला एक प्रश्न विचारण्यात आला की, जर मालिकेच्या मध्यंतराला एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास काय करायचे? सद्य परिस्थिती पाहता ती मालिकाच रद्द होण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांना आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. द्रविड म्हणाला,''ही परिस्थिती लवकर सुधरावी, अशी सर्वांना आशा आहे. बायो बबलमध्ये तुम्ही सर्व खेळाडूंची चाचणी कराल, त्यांना क्वारंटाईन कराल आणि मालिकेच्या मध्यंतराला एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास काय? त्यानंतर काय होईल? आताच्या नियमानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी येतील आणि सर्वांना क्वारंटाईन करतील.''

तो पुढे म्हणाला,''त्यामुळे ती कसोटी किंवा मालिका रद्द करावी लागेल. त्याचा दोन्ही संघांना मोठा आर्थिक फटका बसेल. त्यामुळे अशा परिस्थितितून तोडगा काढण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनासोबत योग्य समन्वय राखून काम करायला हवं आणि खेळाडू पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये, यासाठी मार्ग शोधायला हवा.''  प्रेक्षकांविना खेळणे हेही मोठं आव्हान असेल असंही द्रविड म्हणाला. पण, क्रिकेटपटूंना प्रेक्षकांविना खेळण्याची सवय लावून घ्यायला हवी.  

टॅग्स :राहूल द्रविडकोरोना वायरस बातम्याइंग्लंड