कोलकाता : ईडन गार्डनसारख्या आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळण्यास भारतीय संघ सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केली. पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात भारताची ३ बाद १७ अशी अवस्था झाली आहे. दिवसाचा खेळ थांबविण्यात आल्यानंतर बांगर पत्रकार परिषदेत बोलत होते.
येथे गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत मिळवलेल्या विजयाची आठवण काढताना बांगर म्हणाले, सध्याचा भारतीय संघ आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज आहे.
ढगाळ वातावरणामुळे पहिल्या दिवशी केवळ ११.५ षटकांचा खेळ शक्य झाला. बांगर म्हणाले, ‘आम्हाला अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्याचा आनंद आहे. कुठलाही संघ सहज वाटणाºया स्थितीमध्ये खेळण्यास इच्छुक नसतो. आम्ही स्वत:ला आव्हान देतो आणि अनेक खेळाडू अशा आव्हानात्मक परिस्थितीसाठी सज्ज आहेत. एक संघ म्हणून आम्ही सुधारणा करण्यास इच्छुक आहोत. गेल्या वर्षी असलेल्या खेळपट्टीप्रमाणेच ही खेळपट्टी असून, त्या खेळपट्टीलाच पुन्हा तयार करण्यात आले आहे. आम्ही कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली होती.’
बांगर म्हणाले, ‘परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल नाही. फलंदाजांना सलग १५-२० षटके खेळता न आल्यामुळे लय गवसली नाही. या लढतीत भारतीय संंघ नक्की पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे.’
उभय संघांनी खेळणे शक्य होण्यासाठी कृत्रिम प्रकाशझोतात खेळण्यास सहमती दर्शवली आहे.
बांगर म्हणाले, ‘हा सामना दिवस-रात्र कसोटीप्रमाणे राहील. हा दिवसा होणारा सामना वाटत नाही. अशा स्थितीत कधी-कधी लाल चेंडूने खेळणे कठीण असते.’ (वृत्तसंस्था)
चौथ्या व पाचव्या दिवसापर्यंत आमचे सर्व विभागांवर लक्ष आहे. खेळपट्टीत ओल असल्यामुळे थोडे खड्डे होतील आणि असमतोल उसळी मिळेल. त्यामुळे आमचे दोन्ही फिरकीपटू भेदक ठरण्याची शक्यता आहे. आमच्याकडे स्विंग व सीम व्यतिरिक्त अतिरिक्त वेगही आहे.
- संजय बांगर