सिडनी : जोस बटलरचे शतक आणि ख्रिस व्होक्सचा अष्टपैलू खेळ याच्या जोरावर इंग्लंडने तिसºया वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी आॅस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या निकालासह इंग्लंडने अॅशेस मालिकेत ०-४ ने झालेल्या पराभवाची काही अंशी परतफेड करण्यात यश मिळवले. आॅस्ट्रेलियाकडे मालिकेतील आव्हान कायम राखण्याची ही अखेरची संधी होती. अॅशेस मालिकेनंतर आॅस्ट्रेलिया प्रथमच सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमणासह या लढतीत सहभागी झाला, पण तरी इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३०२ धावांची मजल मारली.
इंग्लंडने ६०व्यांदा डावात ३०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली. त्याचे सर्व श्रेय बटलर (नाबाद १००) आणि व्होक्स (नाबाद ५३) यांना जाते. ६ बाद १८९ अशी अवस्था असताना या दोघांनी संघाला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. बटलर व व्होक्स यांनी १२ पेक्षा कमी षटकांमध्ये ११३ धावांची अभेद्य भागीदारी केली.
प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलिया संघाला ६ बाद २८६ धावांची मजल मारता आली. व्होक्सने ५७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. याव्यतिरिक्त मार्क वुड व आदिल राशिद यांनीही प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी परतवले. दोन्ही सामन्यात शतकी खेळी करणारा आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज अॅरोन फिंचने कामगिरीत सातत्य राखताना ६२ धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने ५६, मिशेल मार्शने ५५ आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथने ४५ धावांचे योगदान दिले; पण अखेरच्या पाच षटकांत इंग्लंडची आक्रमक खेळी निकालातील अंतर स्पष्ट करणारी ठरली.
बटलर व व्होक्स यांनी अखेरच्या पाच षटकांमध्ये इंग्लंडसाठी ६६ धावा फटकावल्या. बटलरने डावाच्या अखेरच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. त्याने ८३ चेंडूंना सामोरे जाताना सहा चौकार व चार षटकार लगावले. व्होक्सने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकार व २ षटकार लगावले. आॅस्ट्रेलियाने या लढतीत पॅट कमिन्स व जोश हेजलवुड यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी दिली. वन-डे मालिकेत आॅस्ट्रेलिया संघ प्रथमच कमिन्स, हेजलवुड व मिशेल स्टार्क या वेगवान त्रिकुटासह खेळला. या त्रिकुटाने अॅशेस मालिकेत संघाला ४-० ने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इंग्लंडला आॅस्ट्रेलियाच्या सुमार क्षेत्ररक्षणाचाही लाभ झाला. त्यांच्या खेळाडूंनी चार झेल सोडले व दोन धावबादच्या संधीही गमावल्या. सर्वांत सोपा झेल कॅमरुन व्हाईटने गमावले. त्याने मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर मोईन अलीचा सोपा झेल सोडला. मोईनला त्याला लाभ घेता आला नाही. सहा धावा केल्यानंतर तो मार्शच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने फिरकीपटू अॅडम जम्पाच्या गोलंदाजीवर इयोन मोर्गनचा (४१) झेल सोडला तर स्टार्कला आपल्याच गोलंदाजीवर झेल टिपण्याची कठीण संधी साधता आली नाही.
आॅस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवुड सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. कमिन्स, मार्कस स्टोइनिस, जम्पा व मार्श यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला आव्हान कायम राखण्यासाठी आज कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते.
उभय संघांदरम्यान चौथा वन-डे आंतरराष्ट्रीय सामना २६ जानेवारी रोजी अॅडिलेडमध्ये खेळल्या जाणार आहे. (वृत्तसंस्था)