लंडन : भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरली. विराट कोहली (४९) वगळता इतर फलंदाज थोड्याफार फरकाने इंग्लिश गोलंदाजीचा सामना करण्यात आजही अपयशी ठरले. इंग्लंडच्या ३३२ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने आज दिवसअखेर ५१ षटकांत ६ बाद १७४ धावा केल्या.
इंग्लिश गोलंदाजीसमोर भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. सलामीवीर शिखर धवन या सामन्यातही अपयशी ठरला. तो ३ धावा करून बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉड याने त्याला पायचित केले. त्यानंतर राहुल आणि पुजारा यांनी ६४ धावांची भागीदारी केली. मात्र के. एल. राहुल ३७ धावांवर बाद झाला. त्याला सॅम क्युरनने बाद केले. त्यानंतर कोहली आणि पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाज स्थिर झाल्यावर अँडरसनने पुजाराला झेलबाद केले. पुजाराने यष्टिरक्षक बेअरस्टोकडे झेल दिला. अजिंक्य रहाणेला यावेळीही भोपळा फोडता आला नाही. कर्णधार विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. स्टोक्सने त्याला रुटकरवी झेलबाद केले. कसोटीत पर्दापण करणाऱ्या हनुमा विहारी याने एका बाजूने चांगली खिंड लढवली. त्याने ५० चेंडूंत २५ धावा केल्या. त्यात एक षटकार आणि तीन चौकारही लगावले. रिषभ पंतही लगेचच बाद झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५१ षटकांत ६ बाद १७४ धावा केल्या होत्या. विहारी २५ धावांवर, तर जडेजा ८ धावांवर खेळत होते. अँडरसन, स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन, तर ब्रॉड आणि क्युरन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी पहिल्या दिवशीच्या १९८ धावांवरून खेळताना आदिल राशिद (१५)आणि बटलर (८९) यांनी संघाला २०० चा टप्पा गाठून दिला. मात्र लगेचच आदिल राशिद बाद झाला. राशिदला बुमराहने पायचित केले. त्यानंतर बटलर, स्टुअर्ट ब्रॉड (३५) यांनी भारताला यश मिळू दिले नाही. ब्रॉड, बटलर यांनी नवव्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी करत इंग्लंडची धावसंख्या ३३२ वर नेली.
>संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : सर्व बाद ३३२ धावा (जोस बटलर ८९, आदिल राशिद १५, स्टुअर्ट ब्रॉड ३८ गोलंदाजी - जसप्रीत बुमराह ३/८३, इशांत शर्मा ३/६२, रवींद्र जडेजा ४/७९) भारत पहिला डाव : ५१ षटकांत ६ बाद १७४ धावा, (लोकेश राहुल ३७, चेतेश्वर पुजारा ३७, विराट कोहली ४९, हनुमा विहारी खेळत आहे २५, रवींद्र जडेजा खेळत आहे ८. गोलंदाजी : जेम्स अँडरसन २/२०, स्टुअर्ट ब्रॉड १/२५, बेन स्टोक्स २/४४, सॅम क्युरन १/४६).