मुंबई : भारतीय क्रिकेटचा मजबूत पाया मानल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेनं अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला दिले. या स्पर्धेकडे परदेशी खेळाडूही आकर्षक झाले आहेत आणि त्यांनी विविध हंगामात राज्य संघाचे प्रतिनिधित्वही केल आहे. इंग्लंडचा माँटी पानेसर हाही रणजी खेळण्यासाठी उत्सुक आहे. पानेसर यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर असलेला पानेसर आता रणजी करंडक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कामगिरीची छाप पाडण्यासाठी आतुर आहे. यंदाच्या रणजी मोसमात तो पुद्दुचेरी संघाकडून खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पानेसरने 2013 साली
इंग्लंडकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता आणि 2016 पासून तो कौंटी क्रिकेटपासूनही दूर आहे. क्रिकेटपासून दूर असल्याने मी नैराश्याच्या गर्तेत होतो आणि मद्याच्या सेवनाचेही प्रमाण वाढले होते, असे त्यानं स्वतःच्या आत्मचरित्रात लिहीले आहे. तो म्हणाला,''यंदाच्या मोसमात मी रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुद्दुचेरी संघाकडून मला ही संधी मिळू शकते. ते परदेशी खेळाडूला खेळण्याची परवानगी देतील.''
पानेसरने खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानं पुद्दुचेरी चर्चेत आले आहेत. पुद्दुचेरीनं यापूर्वीच पाहुणा खेळाडू म्हणून कर्नाटकचा विनय कुमार, तामिळनाडूचा केबी अरुण कार्थिक यांना संघात समाविष्ट करून घेतले आहे. गत मोसमात हिमाचल प्रदेशचा पारस डोग्रा पुद्दुचेरीकडून खेळला होता. पानेसरने इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना 50 कसोटीत 167 विकेट्स, तर 26 वन डे सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या आहेत.
यापूर्वीही रणजी स्पर्धेत परदेशी खेळाडू खेळले आहेत. 2006-07 च्या मोसमात इंग्लंडचा विक्रम सोलंकी आणि कबीर अली यांनी राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारताचा फिरकीपटू दिलीप दोशी याचा मुलगा नयन दोशी ( इंग्लंडचा क्रिकेटपटू) 2000-01च्या रणजी मोसमात सौराष्ट्रकडून खेळला होता. त्याशिवाय वेस्ट इंडिजचे जेर्मिन लॉसन आणि इंग्लंडचे डॅरेन गॉफ यांनी 2006-07च्या मोसमात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.