एजबस्टन : इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरोधात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ९ बाद २८५ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रुट (८०) आणि जॉनी बेअरस्टो (७०) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. आश्विन याने चार बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या झुंजीमुळे आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सर्व बाद करण्यात अपयश आले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज अॅलेस्टर कुक याला अश्विनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्या वेळी इंग्लंडचा संघ २६ धावांवर होता. मात्र के.के. जेनिंग्ज आणि जो रुट यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. ईशांत शर्मा आणि उमेश यादव या जोडीला इंग्लंडच्या कर्णधाराने यश मिळू दिले नाही. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने मोहम्मद शमी याच्या हाती चेंडू सोपवला. त्याने जेनिंग्जला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. चौथ्या स्थानावर आलेल्या डेविड मालन याला मोहम्मद शमी यानेच पायचीत पकडले. मालन हा फक्त ८ धावा करून बाद झाला. त्या वेळी संघाची धावसंख्या ३ बाद ११२ होती. त्यानंतर जो रुट याने बेअरस्टोच्या साथीने शतकी भागीदारी केली. रुट बाद झाल्यावर उमेश यादवने बेअरस्टोला बाद केले. जो रुट याने ८० धावांच्या खेळीत ९ चौकार लगावले. तर बेअरस्टो याने ८८ चेंडूतच ७० धावा केल्या.
आश्विनने बेन स्टोक्सला स्वत:च्याच चेंडूवर झेलबाद केले. जोश बटलरलाही त्यानेच पायचीत पकडत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. इंग्लंडचा डाव २५० धावांच्या आतच संपेल असे वाटत असताना सॅम क्युरान (नाबाद २४) आणि आदिल राशिद (१३) यांनी चिवट झुंज सुरूच ठेवली. डावाच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्युरानला बाद करण्याची संधी कार्तिकने दवडली. त्याने शमीच्या चेंडूवर क्युरानचा झेल सोडला.
धावफलक :
इंग्लंड - पहिला डाव ८८ षटकांत ९ बाद २८५ धावा, अलेस्टर कुक गो. आश्विन १३, के.के. जेनिंग्ज गो. मोहम्मद शमी ४२, जो रुट धावबाद कोहली ८० , डेविड मालन पायचीत मोहम्मद शमी ८, जॉनी बेअरस्टो गो. यादव ७०, बेन स्टोंक्स झे.गो. आर आश्विन २१, जोश बटलर पायचीत आश्विन ०, सॅम क्युरान नाबाद २४, आदिल राशिद पायचीत गो. शर्मा १३, स्टुअर्ट ब्रॉड पायचीत गो. आर. आश्विन १, जेम्स अँडरसन नाबाद ०. अवांतर १३.
गोलंदाजी - उमेश यादव १/५६, ईशांत शर्मा १/४६, आर. आश्विन ४/६०, मोहम्मद शमी २/६४, हार्दिक पांड्या ०/४६.