Join us

इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर आयर्लंडचे फलंदाज गार; 38 धावांत गुंडाळला संघ

लंडन : इंग्लंडचे 182 धावांचे माफक लक्ष्य आयर्लंड संघाला पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 38 धावांत तंबूत परतला. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:40 IST

Open in App

लंडन : इंग्लंडचे 182 धावांचे माफक लक्ष्य आयर्लंड संघाला पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 38 धावांत तंबूत परतला. इंग्लंडचा पहिला डाव 85 धावांत गुंडाळून आयर्लंडने 207 धावा करत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात इंग्लंडने सडेतोड उत्तर देत 303 धावा केल्या. 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स या दोघांनीच आयर्लंडचा डाव गुंडाळला. इंग्लंडने हा सामना 143 धावांनी जिंकला. वोक्सने 17 धावांत 6 , तर ब्रॉडने 19 धावांत 4 विकेट्स घेतल्या. 

क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाचा पहिला डाव 23.4 षटकांत 85 धावांत गुंडाळला होता. टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. विशेष म्हणजे मुर्ताघचा जन्म हा लंडनचाच आहे.  त्यानं जोस बर्न ( 6), जॉनी बेअरस्टो ( 0), मोईन अली ( 0) आणि ख्रिस वोक्स ( 0) यांनाही बाद केले.  लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिल्याच कसोटी सामन्यात पाच विकेट घेणारा तो 64वा गोलंदाज ठरला आहे. या कामगिरीनंतर त्याचे नाव लॉर्ड्सच्या हॉनर बोर्डावर लिहिले गेले आहे. त्याला मार्क एडेर ( 3) आणि बॉयड रँकिन ( 2) यांनी उत्तम साथ दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आयर्लंडकडून अँडी बॅलबर्नीनं ( 55) चांगला खेळ केला. आयर्लंडने 207 धावा करत 122 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावातील चूका सुधारत इंग्लंडने दमदार खेळ केला. दुसऱ्या डावात जॅक लीच ( 92), जेसन रॉय ( 72) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 303 धावा केल्या. ब्रॉडने फलंदाजीतही 27 धावांची, तर सॅम कुरननेही 37 धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडचे 182 धावांचे लक्ष्य सहज पार करून आयर्लंडला ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी होती. पण, ब्रॉड व वोक्स यांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांनी शरणागती पत्करली. 

टॅग्स :इंग्लंडआयर्लंड