लंडन : तिसऱ्या कसोटीत अत्यंत सावध पवित्रा घेतलेल्या यजमान इंग्लंडचा दुसरा डाव ६२.१ षटकांत केवळ १९२ धावांत गुंडाळत भारताने सामन्यावर पकड मिळवली. अनुभवी जो रूटने चिवट खेळी करत इंग्लंडला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला; मात्र वॉशिंग्टन सुंदरने त्याला बाद केल्यानंतर यजमानांच्या फलंदाजीला गळती लागली. भारताला आता १९३ धावा काढून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे.
इंग्लंडने बिनबाद २ धावांवरून रविवारी चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारताने इंग्लंडप्रमाणेच पहिल्या डावात ३८७ धावा केल्याने हा सामना रोमांचक स्थितीत आला आहे. सिराजने बेन डकेटला (१२) दिवसाच्या सुरुवातीला बाद केल्यानंतर ओली पोपलाही (४) तंबूचा मार्ग दाखवला. यानंतर झॅक क्रॉली (२२) आणि हॅरी ब्रुक (२३) हे अनुक्रमे नितीशकुमार आणि आकाशदीपच्या गोलंदाजीवर बाद झाले.
येथून इंग्लंडला सावरले ते रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी. रूटने ९६ चेंडूंत एक चौकार मारत ४० धावांची बचावात्मक खेळी केली. तो भारतीयांसाठी डोकेदुखी ठरत असताना ४३व्या षटकात सुंदरने अप्रतिम चेंडूवर त्याला त्रिफळाचित करत बहुमूल्य बळी मिळवून दिला. यानंतर त्याने ४७व्या षटकात जेमी स्मिथचा (८) अडथळा दूर करताना त्यालाही त्रिफळाचित केले. सुंदरने मिळवून दिलेल्या या दोन बळींच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड मिळवली. कर्णधार बेन स्टोक्सचा अडथळाही सुंदरनेच दूर केला. त्याने ५५व्या षटकात त्याला त्रिफळाचीत केले. स्टोक्सने ९६ चेंडूंत ३ चौकारांसह ३३ धावा केल्या. यानंतर ब्रायडन कार्स (१) आणि ख्रिस वोक्स (१०) यांना बुमराहने त्रिफळाचीत केल्यानंतर शोएब बशीरलाही (२) त्रिफळाचीत करत सुंदरने इंग्लंडचा डाव गुंडाळला. इंग्लंडने अखेरचे ५ फलंदाज ३८ धावांत गमावले.
धावफलक इंग्लंड (पहिला डाव) : ११२.३ षटकांत सर्वबाद ३८७ धावा. भारत (पहिला डाव) : ११९.२ षटकांत सर्वबाद ३८७ धावा. इंग्लंड (दुसरा डाव) : झॅक क्रॉली झे. जैस्वाल गो. नितीशकुमार २२, बेन डकेट झे. बुमराह गो. सिराज १२, ओली पोप पायचित गो. सिराज ४, जो रूट त्रि. गो. सुंदर ४०, हॅरी ब्रुक त्रि. गो. आकाशदीप २३, बेन स्टोक्स त्रि. गो. सुंदर ३३, जेमी स्मिथ त्रि. गो. सुंदर ०, ख्रिस वोक्स त्रि. गो. बुमराह १०, ब्रायडन कार्स त्रि. गो. बुमराह १, जोफ्रा आर्चर नाबाद ५, शोएब बशीर त्रि. गो. सुंदर २. अवांतर - ३२. एकूण : ६२.२ षटकांत सर्वबाद १९२ धावा. बाद क्रम : १-२२, २-४२, ३-५०, ४-८७, ५-१५४, ६-१६४, ७-१८१, ८-१८२, ९-१८५, १०-१९२. गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १६-३-३८-२; मोहम्मद सिराज १३-२-३१-२; नितीशकुमार रेड्डी ५-१-२०-१; आकाशदीप ८-२-३०-१; जडेजा ८-१-२०-०; वॉशिंग्टन सुंदर १२.१-२-२२-४.
दोन संघ एक धावसंख्यालॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने सर्वबाद ३८७ धावा फलकावर लावल्या. त्यानंतर भारताचा पहिला डावसुद्धा ३८७ धावसंख्येवर आटोपला. दोन्ही संघांनी एकच धावसंख्या उभारण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही केवळ नववी वेळ होती. कसोटी क्रिकेटमध्ये एकसारखी धावसंख्या उभारणाऱ्या संघांचा घेतलेला हा आढावा...
मितालीच्या हस्ते 'घंटानाद'ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियममध्ये प्रत्येक कसोटी सामन्यात दिवसाचा खेळ सुरू करण्याआधी येथील प्रतिष्ठीत घंटा वाजविण्याची प्रथा आहे. क्रिकेटविश्व गाजवलेल्या माजी क्रिकेटपटूंना साधारणपणे ही घंटा वाजविण्याचा मान दिला जातो. रविवारी भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हा सन्मान भारताची माजी दिग्गज कर्णधार मिताली राज हिला मिळाला. तिने यावेळी दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी लॉर्ड्समध्ये घंटानाद केला.