लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी जसप्रीत बुमराह अन् आकाश दीपच्या गोलंदाजीवर अगदी जपून खेळले. ही जोडी सेट झालीये असे वाटत असताना शुबमन गिलनं चेंडू नितीश कुमार रेड्डीच्या हाती सोपवला. या पठ्ठ्यानंही आपल्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवत इंग्लंडच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नितीश कुमार रेड्डीनं पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीरांचा खेळ केला खल्लास
इंग्लंडच्या पहिल्या डावातील १४ व्या षटकात नितीश कुमार रेड्डी गोलंदाजीसाठी आला. या षटकातील त्याच्या तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर पूल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यात तो फसला अन् बॅटची कड घेऊन चेंडू रिषभ पंतच्या हाती गेला. ४० चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २३ धावा करून बेन डकेटनं तंबूचा रस्ता धरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपनं एक धाव घेत स्ट्राइक झॅक क्रॉउलीला दिले. शेवटच्या चेंडूवर नितीश कुमारनं त्यालाही चकवा दिला अन् त्याला पंतकरवी झेलबाद केले. क्रॉउलीनं ४३ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने १८ धावा केल्या.