ENG vs IND Yashasvi Jaiswal Joint Fastest Indian To 2000 Test Runs : बर्मिंगहॅम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल याने मोठा विक्रम आपल्या नावे केला. इंग्लंडचा पहिला डाव आटोपल्यावर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुलनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण यावेळी तो मोठी खेळी करण्यात चुकला. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा युवा सलामीवीर दुसऱ्या डावात २२ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३८ धावा करून तंबूत परतला. या अल्प खेळीसह त्याने लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा विक्रम मोडित काढला. एवढेच नाही तर द्रविड, सेहवाग, गौतम गंभीर आणि विजय हजारे या दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केलीये.
पहिल्या डावात दमदार खेळी, दुसऱ्या डावात १० धावांसह गाठला २००० धावांचा पल्ला
यशस्वीनं कसोटीत पदार्पण केल्यापासून सातत्याने दमदार कामगिरीसह आपली खास छाप सोडली आहे. इंग्लंड दौऱ्यातील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालनं दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ८७ धावांची खेळी केली होती. बर्मिंगहॅमच्या मैदानातील कसोटीतील दुसऱ्या डावात १० धावा करताच त्याने कसोटी कारकिर्दीत २००० धावा पूर्ण केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लिटल मास्टर गावसकरांचा विक्रम मोडला
यशस्वी जैस्वाल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने २००० धावा करणारा भारतीय बॅटर ठरला आहे. त्याने लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी १० हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या गावसकरांनी २००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी २३ कसोटी सामने खेळले होते. यशस्वी जैस्वालनं २१ व्या सामन्यात हा डाव साधला आहे.
द्रविड, सेहवाग अन् गंभीर या दिग्गजांच्या विक्रमाशीही बरोबरी
यशस्वी जैस्वालनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात कसोटी कारकिर्दीत २००० धावांचा पल्ला गाठला. अवघ्या ४० डावात त्याने हा टप्पा गाठला आहे. याआधी राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि विजय हजारे या दिग्गजांनी ४० डावात ही कामगिरी केली होती.