Pakistan vs England 3rd T20I : बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी गुरुवाती २०३ धावांची विक्रमी भागीदारी करून पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. इंग्लंडचे २०० धावांचे लक्ष्य बाबर-रिझवान या दोघांनीच पार केले. त्यांच्यावर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला, परंतु अवघ्या २४ तासांत वाघांची शेळी झाली.. इंग्लंडने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात कराचीच्या त्याच स्टेडियवर पाकिस्तानला जमिनीवर आणले. पाकिस्तानच्या कालच्या २०३ धावांना आज इंग्लंडकडून सडेतोड उत्तर मिळाले आणि त्यांनी २२१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांच्या फलंदाजांना नाक घासण्यास भाग पाडले.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा ओपनर फिल सॉल्ट ( ८) व डेवीड मलान ( १४) हे अपयशी ठरले. पण, विल जॅकने तिसऱ्या विकेटसाठी बेन डकेटसह डाव सावरला. जॅक २२ चेंडूंत ८ चौकारांसह ४० धावा करून माघारी परतला. डकेट व हॅरी ब्रूक यांनी वादळ आणले ३ बाद ८२ वरून दोघांनी इंग्लंडला थेट २२१ धावांपर्यंत पोहोचवले. डकेटने ४२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह नाबाद ७० धावा केल्या. ब्रूकने ३५ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८१ धावा कुटल्या. काल गोलंदाजीत फुशारक्या मारणारा शाहनवाज दहानी आज सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या ४ षटकांत इंग्लंडने ६२ धावा चोपल्या.
कालचे नायक आज फेल ठरले . बाबर आजम ( ८) व मोहम्मद रिझवान ( ८) दोघंही २१ धावांवर माघारी परतले. हैदर अलीने ३ व इफ्तिकार अहमदने ६ धावा केल्या. खुशदील शाह ( २९) व मोहम्मद नवाज ( १९) यांनी संघर्ष करताना शान मसूदला साथ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शान मसूदने ४० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. मार्क वूडने २४ धावांत ३ व आदिल राशिदने ३२ धावांत २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानला २० षटकांत ८ बाद १५८ धावा करता आल्या आणि इंग्लंडने ६३ धावांनी सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.