England Playing XI, Ind vs Eng 1st T20 : कसोटी मालिकेतील खराब कामगिरीच्या आठवणी मागे सारून आता भारतीय संघ टी२० रिंगणात उतरणार आहे. पाच टी२० सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना उद्या कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने दमदार संघाची निवड केली असून जोस बटलर संघाचा कर्णधार आहे. संघाची रचना पाहता, सामन्यात बटलर विकेट कीपिंग किंवा सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार नाही अशी शक्यता आहे.
इंग्लंडचा मजबूत संघ
बेन डकेट आणि फिल सॉल्ट इंग्लंडसाठी सलामीला येतील. या दोन्ही खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली आहे. यानंतर फॉर्मात असलेला जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. नवा उपकर्णधार हॅरी ब्रूक चौथ्या क्रमांकावर खेळेल. तो सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. लियाम लिव्हिंगस्टन पाचव्या क्रमांकावर तर जेकब बेथेल सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. बेथल याचा हा पहिलाच भारत दौरा असून त्याला IPL 2025 साठी RCB ने खरेदी केले आहे.
वेगवान गोलंदाजांचा भरणा
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू जेमी ओव्हरटर्नचा समावेश आहे, जो उत्कृष्ट फटकेबाजी आणि वेगवान गोलंदाजी करू शकतो. वेगवान गोलंदाज गस अटकिन्सनदेखील चांगली फलंदाजी करू शकतो. त्यासोबतच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड या दोन तगड्या वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. तसेच अनुभवी फिरकीपटू आदिल रशीद हादेखील संघाचा भाग आहे.
- पहिल्या टी२० साठी इंग्लंडचा संघ- बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, लियम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटर्न, गस अटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड