Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

लीड्सवर भारत स्वत:च्या चुकीमुळे हरला, त्यानंतर एजबस्टन कसोटीत वर्चस्व गाजवून विजयी झाला. वेगवान जसप्रीत बुमराह त्या सामन्यात नव्हता, हे विशेष.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 05:21 IST

Open in App

-अयाज मेमन

कन्सल्टिंग एडिटर

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटींप्रमाणे लॉर्ड्सची खेळपट्टीही फलंदाजांना पूरक असल्याचे जाणवत आहे. लीड्स आणि एजबस्टनवर मोठ्या धावा निघाल्या. लॉर्ड्सवर हेच चित्र पाहायला मिळतेय. इंग्लंडमध्ये इतक्या धावा निघण्याचे कारण काय? दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावडोंगर उभारला, तरीही दोन्ही सामन्यांचा निकाल लागला. लीड्सवर भारत स्वत:च्या चुकीमुळे हरला, त्यानंतर एजबस्टन कसोटीत वर्चस्व गाजवून विजयी झाला. वेगवान जसप्रीत बुमराह त्या सामन्यात नव्हता, हे विशेष.                           

गोलंदाजांनी केले चकित...खरेतर भारतीय गोलंदाजांनी जगाला चकित केले. प्रसिद्ध कृष्णाचा अपवाद वगळता सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. लॉर्ड्सवर इंग्लंड मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत असताना बुमराहने अर्धा संघ बाद करीत त्यांना ब्रेक लावला. बुमराह वेगवान चेंडूत विविधता राखतो. त्यामुळे फलंदाज कच खातात. फलंदाजांच्या मनातील विचार आणि खेळपट्टीचा वेध घेण्याची बुमराहमध्ये कमालीची क्षमता आहे.

बुमराह सर्वोत्तम का?क्रिकेटमध्ये सर्वकालीन सर्वोत्तम गोलंदाज कोण, यावर चर्चा सुरू आहे. ‘विस्डेन क्रिकेटर ॲलिमिनॅक’चे संपादक स्काइल्ड बॅरी यांच्यानुसार, जगातील सर्वोत्कृष्ट ५० वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल स्थानावर येतो. बुमराहच्या गोलंदाजीची सरासरी, इकॉनाॅमी आणि स्ट्राइक रेट पाहिल्यास बुमराह सर्वोत्तम का, हे कुणालाही पटणार आहे.

अव्वल ५० वेगवान गोलंदाजांमध्ये काेण-कोण?हेरॉल्ड लारवुड, रे लिंडवॉल, किथ मिलर, हॉल ग्रिफिथ, फ्रेड ट्रूमॅन, ब्रायन स्टाथम, ॲंडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, ईयान बोथम, रिचर्ड हॅडली, कपिल देव, इमरान खान, ॲलन डोनाल्ड, ग्लेन मॅक्ग्रा, ब्रेट ली, वसीम अक्रम, वकार युनूस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जेम्स ॲन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड, कॅगिसो रबाडा. 

टॅग्स :जसप्रित बुमराह