England vs South Africa 2nd ODI : बेन स्टोक्सला निरोपाच्या वन डे सामन्यात विजयाची भेट देता न आल्याचा पुरेपूर राग इंग्लंडने दुसऱ्या वन डे सामन्यात काढला. पावसामुळे २९-२९ षटकांच्या सामन्यात इंग्लंडने ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ८३ धावांवर माघारी परतला. वन डे क्रिकेटमध्ये आफ्रिकेची ही दुसरी निचांक धावसंख्या ठरली. १९९३मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते ६९ धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर २००८मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येते ८३ धावांवर त्यांचा खेळ खल्लास झाला होता. त्यानंतर आज पुन्हा ते ८३ धावांवर तंबूत परतले.
पहिल्या सामन्यात ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या वन डेतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पावसाच्या व्यत्ययामुळे २९-२९ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला अन् इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीला आला. जेसन रॉय ( १४), जॉनी बेअरस्टो ( २८), फिल सॉल्ट ( १७), जो रूट ( १) व मोईन अली ( ६) हे पाच फलंदाज ७५ धावांवर माघारी परतले. कर्णधार जोस बटलर ( १९), लिएम लिव्हिंगस्टोन ( ३८), सॅम कुरन ( ३५) व डेव्हिड विली ( २१) यांनी चांगली फटकेबाजी करून इंग्लंडला २०१ धावांपर्यंत मजल मारून दिली. आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसने ४ विकेट्स, एनरिच नॉर्खियानो दोन विकेट्स घेतल्या.
पहिल्या वन डेत ३३३ धावा करणारा आफ्रिकेचा संघ हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, घडले उलटेच.. २.२ नंतर पुढील १० चेंडूंत आफ्रिकेचे चार फलंदाज तंबूत परतले. क्विंटन डी कॉक ५ धावांवर बाद झाला, तर येनमन मलान, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व एडन मार्कराम भोपळाही फोडू शकले नाहीत. हेनरिच क्लासेन व डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पंरतु सॅम कुरनने मिलरला ( १२) बाद केले. त्यानंतर आदील राशिदने तीन धक्के देत आफ्रिकेची अवस्था ८ बाद ७६ अशी केली. क्लासेन ३३ धावांवर बाद झाला. मोईन अलीने शेवटची विकेट घेताना आफ्रिकेचा डाव ८३ धावांत गुंडाळला आणि इंग्लंडने ११८ धावांनी विजय मिळवला. राशिदने ३, अलीने २ व रिसे टॉप्लीने २ विकेट्स घेतल्या.