लंडन - क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडचे सात फलंदाज 43 धावांत माघारी परतले होते. वयाच्या 38व्या वर्षी तिसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. विशेष म्हणजे मुर्ताघचा जन्म हा लंडनचाच आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यानं घरच्याच संघाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते 116 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जेसन रॉयकडे. रॉयचा हा पहिलाच कसोटी सामना होता, परंतु त्याला अपेक्षांवर खरे उतरता आले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत रॉयने 8 सामन्यांत 7 डावांमध्ये 443 धावा चोपून काढल्या होत्या. त्यात एक शतकाचा, तर चार अर्धशतकाचा समावेश होता. इंग्लंडच्या वर्ल्ड कप जेतेपदाच्या प्रवासात रॉयचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्याला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली, परंतु अवघ्या पाच धावा करून तो माघारी परतला. टीम मुर्ताघने पदार्पणाच्या सामन्यात रॉयची विकेट घेतली.
मुर्ताघने त्यानंतर इंग्लंडला धक्के देण्याचे सत्र सुरूच ठेवले. त्यानं जोस बर्न ( 6), जॉनी बेअरस्टो ( 0), मोईन अली ( 0) आणि ख्रिस वोक्स ( 0) यांनाही बाद केले. मुर्ताघने 11-15 मे 2018 मध्ये आयर्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते आणि त्यानंतर आज तो तिसरा कसोटी सामना खेळत आहे. 1999च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाचा तो सदस्य होता. 2012 मध्ये तो आयर्लंडमध्ये स्थायिक झाला आणि तेथील नागरिकत्व पत्करले. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिल्याच कसोटी सामन्यात पाच विकेट घेणारा तो 64वा गोलंदाज ठरला आहे. या कामगिरीनंतर त्याचे नाव लॉर्ड्सच्या हॉनर बोर्डावर लिहिले गेले आहे.