England vs Ireland, T20 World Cup : आयर्लंडने मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंडला धक्का देण्याचे सत्र ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही कायम राखले. अँड्य्रू बॅलबर्नली व लॉकर टकर यांच्या दमदार खेळीनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी संघाला कमबॅक करून दिले. पण, १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ ८६ धावांत माघारी परतला. पावसामुळे हा सामना उशीरा सुरू झाला आणि पुन्हा पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड मागे होता. आयर्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना नेट रन रेट वाढता राखला आणि त्याचे दडपण इंग्लंडवर जाणवत होते. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बंगळुरू येथे इंग्लंडचे ३२७ धावांचे लक्ष्य केव्हिन ओ'ब्रायनच्या वादळी खेळीच्या जोरावर आयर्लंडने पार करून धक्कादायक निकाल नोंदवला होता. आजही आयर्लंडने DLS नुसार ५ धावांनी सामना जिंकला.
पॉल स्टर्लिंगने ( १४) माघारी परतल्यानंतर बॅलबर्नली व टकर यांनी सुरेख फटेकबाजी केली. १२व्या षटकात आदिश रशिदच्या गोलंदाजीवर आयर्लंडची ही सेट जोडी विचित्र पद्धतीने माघारी परतली. बॅलबर्नलीने मारलेला चेंडू रशिदच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडवरील स्टम्प्सवर आदळला. टकर बराच पुढे आला होता आणि त्याला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. टकर ( ३४) बाद झाल्याने ५७ चेंडूंत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही तुटली. बॅलबर्नलीने ४७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक झळकावणारा बॅलबर्नली हा आयर्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला. मार्क वूडने ३, लिव्हिंगस्टोनने ३ आणि सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. १ बाद १०३ वरून आयर्लंडचा संपूर्ण संघ १५७ धावांत माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"