ENG vs ENG, Jasprit Bumrah dismisses Zak Crawley for 5th time in Tests : लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीनंतर गोलंदाजीतही भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा डाव ४७१ धावांत आटोपल्यावर झॅक क्रॉउली आणि बेन डकेट या जोडीनं इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. दुसरीकडे विकेट्सची गॅरेंटी असलेल्या जसप्रीत बुमराह भारताकडून पहिले षटक घेऊन आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहनं पहिल्याच षटकात साधला विकेटचा डाव
ढगाळ वातावरणात इंग्लंडची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या संघाने त्याचा फायदाही घेतला. भारतीय संघाने अवघ्या ४१ धावांत ७ विकेट्स गमावल्या यामागचे कारण वातावरणात झालेला बदल अन् खेळपट्टीनं बदललेला रंग हे एक प्रमुख कारण होते. कोणत्याही खेळपट्टीवर अचूक मारा करत प्रतिस्पर्धा संघातील फलंदाजांना गुडघे टेकायला लावणाऱ्या जसप्रीत बुमराहसाठी ही अति उत्तम परिस्थितीत होती. परफेक्ट सेटअप सह जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर इंग्लंडची सलामी जोडी फोडून हा डावही साधला. झॅक क्रॉउली पहिल्या स्लिपमध्ये करुण नायरच्या हाती झेल देऊन परतला. त्याने ६ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने चार धावा करून तंबूचा रस्ता धरला.
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
इंग्लंडच्या या सलामीवीराची बुमराहनं पाचव्यांदा केली शिकार
इएसपीएन क्रिकइन्फोच्या रेकॉर्ड्सनुसार, जसप्रीत बुमराहनं १४ कसोटी सामन्यात पाचव्यांदा झॅक क्राउलीची शिकार केली आहे. २३३ चेंडूचा सामना करताना इंग्लंडच्या या सलामीवीरानं बुमराहच्या गोलंदाजीवर १२२ धावा केल्या आहेत. पाच पैकी चार वेळा बुमराहनं त्याला इंग्लंडच्या मैदानातच गुडघे टेकायला भाग पाडले आहे.
बुमराहचा भेदक मारा, दुसरा सलामीवीर डकेटलाही दोन वेळा मिळालं जीवनदान
जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटातील पाचव्या चेंडूवरही बेन डकेटला आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण डकेटच्या बॅटची कड घेऊन आलेला चेंडू एका उत्तम झेलमध्ये रुपांतरीत करण्यात यशस्वी जैस्वाल अपयशी ठरला. इंग्लंडच्या डावातील सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवरही डकेट थोडक्यात बचावला. बुमराहच्या गोलंदाजीवर जडेजाने त्याच्या झेलची संधी गमावली.