England vs India, 1st Test Day 3 Mohammed Siraj vs Ben Stokes : इंग्लंड-भारत यांच्यातील लीड्स येथील हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात अखेर बुमराशिवाय सोडून टीम इंडियाच्या ताफ्यातील अन्य गोलंदाजांनी विकेटचं खाते उघडले. प्रसिद्ध कृष्णानं शतकवीर ओली पोपला आपल्या जाळ्यात अडकवत पहिल्या सत्रातील सुरुवातीला इंग्लंडला चौथा धक्का दिला. ओली पोप तिसऱ्या दिवसाच्या खेळात आपल्या वैयक्तिक धावसंख्येत फक्त ८ धावांची भर घालून १०६ धावांवर पंतच्या हाती झेल देऊन माघारी फिरला. मग प्रसिद्ध कृष्णा याच्यानंतर मोहम्मद सिराज पिक्चरमध्ये आला. मोहम्मद सिराजनंबेन स्टोक्सच्या रुपात भारतीय संघाला पाचवे यश मिळवून दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिराजचं आक्रमक सेलिब्रेशन; स्टोक्सनं हवेत भिरकावली बॅट
दुसऱ्या दिवसाच्या खेळात मोहम्मद सिराज याने १४ षटकांत गोलंदाजी करताना ५० धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या स्पेलनंतर प्रत्येक षटकात त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. पण विकेट काही त्याच्या हाती लागली नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळात अखेर बेन स्टोक्सच्या रुपात त्याला पहिली विकेट मिळाली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ६५ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऑफ स्टंप बाहेरचा चेंडू खेळण्याचा स्टोक्सचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कड घेऊन पंतच्या हातात विसावला. पहिल्या विकेटसाठी सिराजला १८ व्या षटकापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. पहिली विकेट मिळवल्यावर त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा कॅप्टननं हवेत बॅट भिरकावत निराशा व्यक्त केली.
सिराजच्या गोलंदाजीत धार दिसते, पण...
जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम बॅकअप देण्याची मोठी जबाबदारी मोहम्मद सिराजवर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने आपली भूमिका चोख बजावल्याचेही पाहायला मिळाले होते. सिराज हा प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण तो ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्या तुलनेत त्याच्या खात्यात विकेट जमा होताना दिसत नाही. बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंड दौऱ्यावर पहिली विकेट मिळवल्यावर उर्वरित खेळात तो आणखी किती विकेट्सचा डाव साधणार ते बघण्याजोगे असेल.
विराटशिवाय सिराजची कामगिरी फिकी, त्यामुळे इंग्लंड दौरा त्याच्यासाठी आव्हानात्मक
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर छाप सोडणं हे एक सिराजसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. कारण कोहलीसोबत खेळताना सिराजची कामगिरीही एकदम भारी राहिली आहे. कोहली फिल्डवर असला की, टीम इंडियाच्या ताफ्यात एक वेगळी ऊर्जा दिसायची. याचा फायदा सिराजलाही झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोहलीसोबत खेळताना सिराजनं ५१ डावात ८१ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. दुसऱीकडे कोहलीशिवाय १७ डावात त्याने फक्त १९ विकेट्स घेतल्या आहेत.