Ravindra Jadeja World Record : भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन कसोटी सामन्यात कॅप्टन शुबमन गिलच्या साथीनं द्विशतकी भागीदारी रचली. २०२२ च्या दौऱ्यानंतर या मैदानात तो पुन्हा एकदा शतकी खेळी करेल, असे वाटत होते. पण जोस टंगच्या उसळत्या चेंडूवर तो फसला अन् ८९ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. त्याचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले असले तरी इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील शानदार खेळीसह जडेजानं WTC च्या इतिहासात नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रवींद्र जडेजानं साधला वर्ल्ड रेकॉर्डचा डाव
रवींद्र जडेजा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत २००० धावा अन् १०० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात ७९ धावा करताच जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत २००० धावा पूर्ण केल्या. यासह त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
शुबमन गिल ते सचिन तेंडुलकर! SENA देशांत टेस्टमध्ये बेस्ट इनिंग खेळणारे भारतीय कॅप्टन
जड्डूची WTC मधील कामगिरी
WTC च्या आतापर्यंतच्या इतिहासात जडेजाने ४१ सामन्यात जवळपास ४० च्या सरासरीने २०१० धावा केल्या आहेत. यात ३ शतकासह १३ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने १३२ विकेट्स घेताना ६ वेळा पाच विकेट्स तर ६ वेळा चार विकेट्स घेण्याचा डाव साधला आहे. बॅटिंगनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून गोलंदाजीतही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.
गिलसोबत द्विशतकी भागीदारी
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाच्या धावफलकावर ५ बाद २११ धावा असताना सातव्या क्रमांकावर जडेजा फलंदाजीला आला. त्याने शुबमन गिलच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलणारी ठरली.
बर्मिंगहॅमच्या मैदानात जड्डूचा रुबाब
रवींद्र जडेजाने बर्मिंगहॅमच्या मैदानात दुसऱ्यांदा द्विशतकी भागीदारीत मोलाचा वाटा रचल्याचे पाहायला मिळाले. शुबमन गिलसोबत २०३ धावांची भागीदारी करण्याआधी २०२२ मध्ये रिषभ पंतच्या साथीनं त्याने २२२ धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी त्याच्या भात्यातून या मैदानातील १०४ धावांची सर्वोच्च खेळी पाहायला मिळाली होती.