ENG vs IND 2nd Test Day 5 : बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाच्या ३ विकेट्स घेत इंग्लंडची अवस्था ६ बाद १५३ अशी केलीये. लंच ब्रेक आधी वॉशिंग्टन सुंदरनं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला पायचित करत संघाला सहावे यश मिळवून दिले. आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजीची धूरा सांभाळल्यावर फिरकीपटूला मिळालेली या सामन्यातील ही पहिली विकेट ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्धा संघ तंबूत परतल्यावर बेन स्टोक्स-जेमी स्मिथ जोडी जमली
पावसाच्या व्यत्ययामुळे पाचव्या दिवसाचा खेळ उशीरा सुरु झाला. ८० षटकात ७ विकेट्स घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला आकाश दीपनं पहिल्या अर्ध्या तासातच दोन विकेट्स मिळवून दिल्या. अवघ्या ८३ धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला. संघ अडचणीत असताना कर्णधार बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथ या जोडीनं एक दमदार भागीदारी रचली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७० धावांची खेळी केली.
मग 'पिक्चर'मध्ये आला वॉशिंग्टन सुंदर
ही जोडी सेट झाली, असताना वॉशिंग्टन सुंदर पिक्चरमध्ये आला. लंच ब्रेकआधीच्या शवेटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने बेन स्टोक्सला पायचित केले. वॉशिंग्टन सुंदर अन् विकेट किपर रिषभ पंतच्या अपीलनंतर मैदानातील पंचांनी स्टोक्सला आउट दिले. पण आश्चर्यचकित होत इंग्लंड कर्णधाराने DRS घेतला. टेलिव्हिजन अंपायरनं मैदानातील पंचाचा निर्णय कायम ठेवला अन् इंग्लंडच्या संघाने इंग्लंड कर्णधाराच्या रुपात १५३ धावांवर सहावी विकेट गमावली. बेन स्टोक्स ७३ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३३ धावा करून तंबूत परतला. हा सामना जिंकून मालिकेत १-१ बरोबरी करण्यासाठी पुढच्या दोन सत्रात भारतीय संघाला आता फक्त ४ विकेट्सची गरज आहे.