इंग्लंडचा बालेकिल्ला असलेल्या बर्मिंगहॅमच्या मैदानातील पहिल्या कसोटी विजयासाठी टीम इंडियानं कंबर कसलीये. सेनापती शुबमन गिलसह अन्य फलंदाजांनी दमदार कामगिरी करत इंग्लंडसमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केल्यावर भारतीय गोलंदाजांनी आम्हीही कमी पडणार नाही, याची झलक दाखवून दिली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजनं दुसऱ्याच षटकात यजमान संघाला झॅक क्रॉउलीच्या रुपात पहिला धक्का दिला. त्यानंतर पिक्चरमध्ये आला तो आकाश दीप. जसप्रीत बुमराहच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेलाय या गड्यान दुसऱ्या डावात दोन महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. जो रूटची विकेट अन् त्यानंतर आकाश दीपनं केलेले सेलिब्रेशन एकदम खास होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी बेन डकेटची केली शिकार
आकाश दीपनं अप्रतिम इनस्विंग चेंडू टाकत बेन डकेटचा त्रिफळा उडवत दुसऱ्या डावातील आपली पहिली विकेट घेतली. तो १५ चेंडूत २५ धावा करून तंबूत परतला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकात आकाश दीपनं त्याची शिकार केली. त्यानंतर त्याने जो रूटची विकेट घेत भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. जो रूटला त्याने Unplayable Delivery टाकून चकवा दिला.
... जो रुटला चारीमुंड्याचित केल्यावर आकाशदीपच कूल सेलिब्रेशन
दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यावर जो रुटची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती. कसोटीत १३ हजारपेक्षा अधिक धावा नावे असलेल्या बॅटरला आकाश दीपनं अप्रतिम चेंडू टाकत चकवा दिला. त्याने टाकलेला चेंडू कळायच्या आता रुटचा खेळ खल्लास झाला होता. ड्रिम बॉलवर मोठी विकेट मिळवल्यावर आकाश दीपनं कूल अंदाजात सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले. जो रूट मैदानात नांगर टाकून बराच वेळ मैदानात टिकून राहणारा फलंदाज आहे. टीम इंडियाच्या विजयात तो एक मोठा अडथळाच होता. त्याला अवघ्या ६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवत आकाश दीपनं विजयाचा 'रूट' सोपा केला आहे.